मुंबई : अभिनेत्री प्रिया बापट नेहमीच आपल्या फिटनेससाठी चर्चेत असते. ती आरोग्याची काळजी घेत असते. तंदुरुस्त राहण्यासाठी ती नियमित जिमला जाते. अनेकदा उमेश कामत, तिचा पतीही तिच्या बरोबर असतो. पण सध्या प्रिया नवं काही करते. त्याबद्दल तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
प्रियानं स्वीमिंग सुरू केलंय. ती सध्या पोहण्याचा आनंद घेतेय. त्याचे फोटोही तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अभिनेत्री लिहिते, ' खूप काही शिकण्यासारखं आहे. खूप सारा अनुभव घेण्यासारखा आहे. मी वर्षभर नियमित जिमला जात होते. दरम्यान मी बाहेर रस्त्यावर जाॅगिंगही करते. आणि आता मी स्वीमिंग एंजाॅय करतेय.'
प्रिया पुढे लिहिते, 'प्रत्येक स्पोर्ट तुम्हाला तुमच्याबद्दल, तुमच्या शरीराबद्दल आणि तुमच्या श्वासाबद्दल नवं काही शिकवत असतं. स्वीमिंग ही माझी नवी गर्लफ्रेंड आहे. पण जिम ट्रेनिंग ही माझी कायमस्वरूपी रिलेशनशिप आहे.' प्रिया या सगळ्यांबद्दल जिम ट्रेनर शैलेश परुळेकर यांचे आभार मानते. त्यांच्यासारखे ट्रेनर मिळाले, म्हणून स्वत:ला भाग्यवान समजते.
काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीनं उमेशबरोबर जिमला जातानाचा फोटो शेअर केला होता. प्रियानं लिहिलं होतं, 'पुन्हा एकदा सकाळचा व्यायाम सुरू. पावसाळी सकाळ आणि तेलकट केसानं मी माझ्या वर्कआऊट जोडीदाराबरोबर जातेय.' उमेशनंही ही पोस्ट शेअर करत लिहिलं होतं, 'दिवसाची परिपूर्ण सुरुवात.' त्यांच्या या पोस्टवर बऱ्याच जणांनी कौतुकाचा वर्षाव केला होता.
सिटी ऑफ ड्रीम्स वेब सीरिजमधली प्रियाची भूमिका खूपच गाजली. दोन्ही सीझन हिट होते. प्रियानं २०१८ मध्ये ‘आम्ही दोघी’ हा चित्रपट केला. त्यानंतर ती मराठी चित्रपटांत दिसली नाही. मला मराठी चित्रपट करायचा नाही, असा गैरसमज सध्या पसरला आहे, असं प्रिया सांगते. ती म्हणाली, ‘मला चांगल्या भूमिका करायच्या आहेत. खरं तर या चित्रपटानंतर मराठीत मला चांगल्या भूमिका मिळाल्या नाहीत. त्यामुळे चांगल्या भूमिकेची वाट पाहत आहे.’ असंही प्रियानं स्पष्ट केलं आहे.
------------------
टिप्पणी पोस्ट करा