भारतीय नौदलाच्या महिला वैमानिकांनी रचला इतिहास.

पोरबंदर येथील नेव्हल एअर एन्क्लेव्ह, स्थित भारतीय नौदलाच्या INAS 314 च्या पाच महिला अधिकार्‍यांनी 03 ऑगस्ट 2022 रोजी, डॉर्नियर 228 विमानातून उत्तर अरबी समुद्रात स्वतंत्र टेहळणी आणि देखरेख मोहीम पूर्ण करून इतिहास रचला. या पथकात सर्व महिला होत्या. महिलांची अशा प्रकारे स्वतंत्रपणे राबवण्यात आलेली ही पहिलीच मोहीम होती. या विमानाच्या कॅप्टन, मोहिमेच्या प्रमुख लेफ्टनंट कमांडर आंचल शर्मा होत्या. त्यांच्या पथकात वैमानिक लेफ्टनंट शिवांगी आणि लेफ्टनंट अपूर्वा गिते, टॅक्टिकल अँड सेन्सर अधिकारी, लेफ्टनंट पूजा पांडा आणि सब लेफ्टनंट पूजा शेखावत होत्या. INAS 314 हे गुजरातमधील पोरबंदर येथे तैनात असलेले नौदलाचे आघाडीचे हवाई पथक असून अत्याधुनिक डॉर्नियर 228 सागरी टेहळणी विमानाचे परिचालन करते. या हवाई पथकाचे नेतृत्व कुशल नेव्हिगेशन इन्स्ट्रक्टर असलेल्या कमांडर एस. के. गोयल यांच्याकडे आहे.
           या ऐतिहासिक मोहिमेपूर्वी महिला अधिकाऱ्यांना अनेक महिन्यांचे प्रशिक्षण आणि मोहिमेचे सर्वसमावेशक बारकावे सांगण्यात आले होते. भारतीय नौदल सशस्त्र दलांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यात आघाडीवर आहे. महिला सशक्तीकरणाच्या या प्रभावी आणि अग्रगण्य उपक्रमांमध्ये महिला वैमानिकांची भर्ती, हेलिकॉप्टर परिचालनात महिला हवाई संचालन अधिकाऱ्यांची निवड आणि 2018 मध्ये सर्व महिला असलेल्या पथकाची सागरी जगपरिक्रमा,यांचा समावेश आहे.
           या प्रकारची ही पहिलीच लष्करी हवाई मोहीम अनोखी होती आणि त्यामुळे विमान परिचालन क्षेत्रातील महिला अधिकाऱ्यांना अधिक जबाबदारी स्वीकारण्याचा आणि अधिक आव्हानात्मक भूमिकांची आकांक्षा बाळगण्याचा मार्ग मोकळा होण्याची अपेक्षा आहे. संपूर्णपणे महिला अधिकाऱ्यांच्या पथकाने स्वतंत्रपणे टेहळणी मोहीम हाती घेणे हे सशस्त्र दलांसाठी एक अनोखे यश आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने