महाराष्ट्र म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामधील अजितदादांचे राज्य; देवेंद्रांच्या टोलेबाजीने खसखस


 ब्युरो टीम: "महाराष्ट्र म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृ्त्वामधील अजितदादांचे राज्य" असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीची खिल्ली उडवली. त्यानंतर सभागृहामध्ये एकच हशा पिकला होता. फडणवीस बोलताना थोडे थांबले आणि त्यांच्या चेहऱ्यावरही स्मितहास्य दिसून आले.

      जीएसटीच्या दरवाढीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी एक फिटमेंट कमिटी तयार करण्यात आलेली असून, त्यावर बोलताना फडणवीस यांनी या कमिटीमध्ये कोणकोणती राज्ये होती हे वाचून दाखवले. त्यात महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात अजितदादांचे राज्य असल्याचा उल्लेख करत त्यांनी महाविकास आघाडीला चिमटा काढला.

शेरास सव्वाशेर

     विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाजादरम्यान जीएसटीसंदर्भातले विधेयक चर्चेसाठी मांडण्यात आले. या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी तुफान फटकेबाजी करत शिंदे सरकारला धारेवर धरले. मात्र, त्यानंतर भुजबळांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जशास तसे उत्तर दिले.

वेगळीच उपमा दिली

     जीएसटीच्या दरांमध्ये वाढ करण्यासंदर्भातील समितीबद्दल बोलताना फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही टोला लगावला. "महाराष्ट्र म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृ्त्वामधील अजितदादांचे राज्य" असे म्हणत राज्यातील महाविकास आघाडी सरकारसाठी फडणवीस यांनी अगदीच वेगळी उपमा आपल्या भाषणातून दिली.

शिंदेंचा दिल्लीत दरारा

     छगन भुजबळांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील चिमटा काढला. "तुम्ही तिकडे जे मंजूर झाले, ते इथे मंजूर करून घेत आहात. पण महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची महागाईबाबतची ही भावना तिकडे त्यांना तुम्ही सांगा. सगळ्या ठिकाणी भाववाढ सुरू आहे. शाळेतल्या पेन्सिल, खोडरबरवरही जीएसटी लावला आहे. रुग्णालयाच्या 5 हजारांवरच्या बिलावर जीएसटी लावला आहे. आपल्या उपमुख्यमंत्र्यांचा दरारा तर दिल्लीमध्ये खूपच वाढला आहे. मोठ्या कमिटीवर त्यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी जीएसटीसंदर्भातले महाराष्ट्राचे हे म्हणणे दिल्लीत सांगितले पाहिजे" असा टोला भुजबळांनी लगावला.

फडणवीसांचा 'मविआ'ला टोला

    भुजबळ यांच्या टोलेबाजीनंतर त्याला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले. जीएसटीच्या दरवाढीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी एक फिटमेंट कमिटी तयार करण्यात आलेली असे सांगताना फडणवीस यांनी या कमिटीमध्ये कोणकोणती राज्ये होती हे वाचून दाखवले. "राजस्थान म्हणजे काँग्रेसचे राज्य. पश्चिम बंगाल म्हणजे ममता बॅनर्जींचे राज्य. तमिळनाडू म्हणजे डीएमकेचे राज्य. बिहार म्हणजे नितीश कुमारांचे राज्य. उत्तर प्रदेश म्हणजे भाजपाचे राज्य. कर्नाटक भाजपाचे राज्य, महाराष्ट्र म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृ्त्वामधील अजितदादांचे राज्य" असे फडणवीस म्हणताच सभागृहामध्ये एकच हशा पिकला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने