वसई-विरारमध्ये इच्छुकांना दिलासा; प्रत्येक प्रभागात एक खुली जागा

 


ब्युरो टीम: र्वोच्च न्यायालयाने राज्यात ओबीसी आरक्षणाला मंजुरी दिल्यानंतर, वसई विरार महापालिकेमध्ये प्रभाग आरक्षणाकडे लक्ष लागले होते. अखेर शुक्रवारी सोडत पद्धतीने महापालिकेतील प्रभागांचे ओबीसी आरक्षण जाहीर करण्यात आले. या सोडतीनंतर कोणते ३४ प्रभाग ओबीसींसाठी आरक्षित असतील, हे स्पष्ट झाले. निवडणुकीसाठी एका प्रभागात तीन सदस्य असून बहुतांश प्रभागांमध्ये एखादी तरी जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुली असल्याचे या सोडतीअंती स्पष्ट झाले आहे. त्यामुळे इच्छुकांना दिलासा मिळाला आहे. केवळ प्रभाग क्र.२मध्ये तिन्ही जागांवर आरक्षण पडल्याने येथील इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.

       वसई-विरार महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मे महिन्यात आरक्षण सोडत पार पडली होती. मात्र त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार असल्याचे सांगितल्यानंतर, शुक्रवारी पुन्हा एकदा सोडत काढण्यात आली. विरारच्या भाऊसाहेब वर्तक सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ४२ प्रभागांमधील केवळ ओबीसींसाठी आरक्षित जागांसाठी सोडत काढण्यात आली. यावेळी आयुक्त अनिलकुमार पवार, अतिरिक्त आयुक्त आशीष पाटील, अतिरिक्त आयुक्त अजिंक्य बगाडे, उपायुक्त किशोर गवस, नानासाहेब कामठे, कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

    अनुसूचित जाती-जमातींच्या एकूण ११ जागा याआधीच्या सोडतीमध्ये निश्चित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे उर्वरित ११५ जागांमधील ३४ ओबीसी जागा सोडतीद्वारे निश्चित करण्यात आल्या. यामधील १७ जागा या ओबीसी महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. पालिकेच्या ४२ प्रभागांमध्ये प्रत्येकी तीन सदस्य आहेत. आरक्षण सोडतीनंतर, विरार येथील प्रभाग क्र.२ या केवळ एकाच प्रभागामध्ये तिन्ही जागा राखीव झाल्या आहेत. यापैकी एक जागा ओबीसी, तर उर्वरित दोन जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. उर्वरित सर्वच प्रभागांमध्ये किमान एक जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने दिग्गज नेत्यांच्या प्रभागांना धक्का लागलेला नसल्याचे ओबीसी आरक्षण जाहीर झाल्यानंतर दिसून आले आहे. त्यामुळे दिग्गज नेत्यांना या प्रभागात निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे इच्छुकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

      मोठ्या ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे भाजप नेते नीलेश राणे यांनी सांगितले, तर सर्व जागांवर बहुजन विकास आघाडी विजय मिळवेल, असा विश्वास पक्षाचे नेते आजीव पाटील यांनी व्यक्त केला.

कसे आहे आरक्षण?


एकूण सदस्य संख्या : १२६


अनुसूचित जाती : ५


अनुसूचित जमाती : ६


ओबीसी : ३४


सर्वसाधारण : ८१

-------------

आरक्षित प्रभाग


अनुसूचित जाती - एकूण जागा ५


महिला : ११अ , २०अ, २८अ


खुल्या : २९अ, ३०अ


अनुसूचित जमाती - एकूण जागा ६


महिला : १अ, ३६अ, ४२अ


खुल्या : ३अ, ३३अ, २८ ब


ओबीसी - एकूण जागा ३४


महिला : ५अ, ६अ, ७अ, ८अ, १०अ, १४अ, १७अ, २३अ, २४अ, ३२अ, ३४अ, ३५अ, ३७अ, ३८अ, ४०अ, ४१अ, ३३अ


खुल्या : १ब, २अ, ४अ, ९अ, १२अ, १३अ, १५अ, १६अ, १८अ, १९अ, २१अ, २२अ, २५अ, २६अ, २७अ, ३१अ, ३९अ


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने