देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच शिवसेनेची सत्ता आली; दीपक केसरकर यांचा नवा दावा

 

 मुंबईः 'पाच वर्षांपूर्वी म्हणजे सन २०१७मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच शिवसेनेची सत्ता आली,' असा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शनिवारी मुंबईत केला.

देवेंद्र फडणवीस यांनी त्या वेळी उद्धव ठाकरे यांचा मान ठेऊन मुंबईची सत्ता मिळविण्यासाठी काही वेगळे प्रयत्न केले नाहीत, असे केसरकर म्हणाले. 'मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक शिवसेना आणि भाजप युतीत लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. भाजपसोबत आमची युती कायम राहणार आहे. आमच्या स्वार्थासाठी आम्ही कधीही युती तोडणार नाही. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही आणि भाजप दोघेही मिळून १५०पेक्षा अधिक जागा निवडून आणणार,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 'राज्यात शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा सुरू आहे. ही शिवसंवाद यात्रा नव्हे, तर विसंवाद यात्रा आहे. शिवाजी महाराजांचे नाव घेऊन जे राजकारण करत आहात, त्याचा तुम्ही विचार करा. तुम्ही लोकप्रतिनिधींचा अनादर करत आहात. आम्ही न्यायालयात आमचे मुद्दे मांडू, पक्षात लोकशाही आहे का, तेसुद्धा न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊ,' असेही केसरकर यांनी नमूद केले.

  •         'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेल्या हिंदुत्वासाठी आम्ही आपली पदे दावणीला बांधली. हे कोणी करीत नाही, पण आम्ही ते केले. बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा नसलेल्या लोकांसोबत यांनी सत्ता स्थापन केली. नागरिकांनी ज्यांना नाकारले होते, त्यांच्यासोबत हात मिळवणी करून सत्तेत बसले. स्वतः मुख्यमंत्री झाले,' अशी टीका केसरकर यांनी केली. 'आदित्य ठाकरे चुकीच्या गोष्टी पसरविण्यासाठी गोबेल्स नीती वापरत आहेत. त्यामुळे यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल. आज आमच्याबद्दल ते काहीही बोलत आहेत. आता आमचा प्रत्येक प्रवक्ता त्यांना उत्तर देईल,' असे केसरकर म्हणाले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने