दुसरी वन डे जिंकून मालिकाही खिशात, भारताची झिम्बाब्वेवर सलग ८ वा मालिका

 


ब्युरो टीम: गोलंदाजांचं प्रभावी आक्रमण आणि शुभमन गिल, शिखर धवनच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियानं हरारेच्या दुसऱ्या वन डेत 5 विकेट्सनी विजय मिळवला. झिम्बाब्वेनं दिलेलं 162 धावांचं सोपं आव्हान भारतीय संघानं 25.4 षटकातच पार केलं. हा सामना जिंकून 3 सामन्यांच्या या मालिकेत टीम इंडियानं 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

राहुल अपयशी, गिल-धवन सुसाट

    भारतीय संघाचा उपकर्णधार शिखर धवनसह आणि कर्णधार लोकेश राहुलनं भारतीय डावाची सुरुवात केली. पण राहुल अवघी एक धाव काढून बाद झाला. त्यानंतर धवन आणि शुभमन गिलनं पुन्हा एकदा भारताला विजयपथावर नेण्यात मोलाची भूमिका निभावली. धवननं 21 चेंडूत 4 चौकारांसह झटपट 33 धावा फटकावल्या. धवन बाद झाल्यानंतर आलेला ईशान किशन सहा धावांवरच माघारी परतला. पण गिलनं एका बाजूनं फटकेबाजी सुरु ठेवली. गिलनं 6 चौकारांसह 33 धावा केल्या. गिल माघारी परतल्यानंतर दीपक हुडा आणि संजू सॅमसननं 56 धावांची भागीदारी साकारली. हुडा 25 धावा काढून बाद झाला. तर सॅमसननं नाबाद 43 धावांचं योगदान दिलं.

  टीम इंडियाचं भेदक आक्रमण

     टीम इंडियाच्या गोलंदाजांनी हरारेच्या दुसऱ्या वन डेतही झिम्बाब्वेच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. या सामन्यात भारताच्या प्रभावी माऱ्यासमोर झिम्बाब्वेचा डाव 38.1 षटकात 161 धावात आटोपला. दीपक चहरच्या जागी आज मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरला संघात स्थान मिळालं. चहरप्रमाणेच शार्दूलनंही प्रभावी मारा करताना 7 षटकात 38 धावा देताना झिम्बाब्वेच्या तीन फलंदाजांना माघारी धाडलं. याशिवाय मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा आणि दीपक हुडानं प्रत्येकी एकेक विकेट घेतली. तर झिम्बाब्वेचे दोन फलंदाज रन आऊट झाले.

झिम्बाब्वेविरुद्ध सलग चौदावा विजय

    दरम्यान भारतीय संघानं झिम्बाब्वेविरुद्ध जिंकलेली ही सलग चौदावी वन डे ठरली. गेल्या 12 वर्षात झिम्बाब्वेला भारताविरुद्ध एकही वन डे जिंकता आलेली नाही. जून 2010 साली हरारे स्पोर्टस क्लबवरच झिम्बाब्वेनं भारताला अखेरचं हरवलं होतं. पण त्यानंतर गेल्या 14 सामन्यात झिम्बाब्वेला विजयाची चव चाखता आलेली नाही.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने