ईडी सरकार लवकर 'रनआऊट' होईल- राष्ट्रवादी नेते महेश तपासे


    ब्युरो टीम: महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारला दोन महिने पूर्ण होत आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार ईडीमुळं आल्याची टीका विरोधी पक्षांनी केली होती. विरोधकांच्या आरोपांना एकनाथ शिंदे यांनी उत्तर देताना हो हे ईडीचं सरकार आहे, असं म्हटलं होतं. ई म्हणजे एकनाथ शिंदे आणि डी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असल्याचं म्हटलं होतं. शिंदे यांच्या सरकारला दोन महिने पूर्ण होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसनं हल्लाबोल केला आहे. पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी कमी बॉल्सवर जास्त रन काढण्याच्या नादात ईडी सरकार लवकरच 'रनआऊट' होईल, असा टोला लगावला आहे.

  महेश तपासे काय म्हणाले?

           कमी बॉल्सवर जास्त रन काढण्याच्या नादात हे ‘ईडी’ सरकार लवकरच 'रनआऊट' होईल, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला आहे. राजकीय लालसेपोटी ईडी सरकारकडून चुकीचे धोरण तर स्वीकारले जात नाही ना, अशी शंका महाराष्ट्रातील जनतेच्या मनात निर्माण होऊ लागल्याचे तपासे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुजरातच्या हितासाठी 'बुलेट ट्रेन' चा निर्णय तत्परतेने घेतात, परंतु महाराष्ट्रातल्या अनेक विषयांवर निर्णय होत नाही, अशी टीका देखील महेश तपासे यांनी केली आहे.

ईडी सरकार वैफल्यग्रस्त मानसिकतेत

      एकीकडे न्यायालयीन खटला, दुसरीकडे नैराश्यग्रस्त बंडखोर आमदार आणि तिसरीकडे ठाकरे गटाला मिळणारा जनप्रतिसाद आणि त्यावर 'सी वोटर' चा लोकसभा निवडणुकीबाबत आलेला सर्व्हे या सर्व बाबींमुळे ईडी सरकार वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये आहे, असा हल्लाबोल तपासे यांनी केला.

     कमी बॉलवर जास्त रन काढण्याच्या नादात असल्याची कबुली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच दिली आहे. त्यामुळे विश्वासघाताच्या आधारावर स्थापन झालेले शिंदे सरकार जास्त काळ टिकेल असे वाटत नाही, असेही महेश तपासे म्हणाले.

       दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीनं करण्यात आलेल्या टीकेला एकनाथ शिंदे गट आणि भाजपकडून काय प्रत्युत्तर दिलं जाणार हे पाहावं लागणार आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने