भाजपा-मनसे युती? बावनकुळेंचे मोठे विधान, राज ठाकरेंची भेट घेणार…



बयूरो टीम: राज्यात हिंदुत्ववादी विचारांनी चालणारे एकनाथ शिंदे-भाजपचे सरकार येत असल्याने या सरकारला देण्याचा निर्णय मनसेने घेतला. विश्वासदर्शक ठरावावेळी विधानसभेत मनसेच्या एकमेव आमदाराने सरकारच्या बाजूने मतदान केले. आता आगामी निवडणुकांमध्ये मनसे-भाजपा एकत्र येणार का? अशी चर्चा पुन्हा रंगली आहे. समोर जी परिस्थिती दिसून येईल तसा निर्णय घेऊ, असे सूचक विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी केले.

         चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज ठाकरे यांनी मनसेबाबत जी भूमिका स्पष्ट केली आहे. त्याबाबत जनता योग्यच निर्णय घेईल. जनतेला काय स्वीकारार्ह आहे ते मतदानाच्या माध्यमातून उघड होईल. पक्ष विस्तारासाठी , पक्षाला ताकद देण्यासाठी राज ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरे हे हिंदुत्वापासून बरेच लांब गेले आहेत. ते आपल्या ४० आमदारांना सोडायला तयार आहेत परंतु सत्ता आणि शरद पवारांना सोडण्यास ते तयार नाहीत. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नवाब मलिकांच्या भूमिकेवरून उद्धव ठाकरे हिंदुत्वापासून दूर झाल्याचे आता सिद्ध झाले, असा चिमटाही त्यांनी काढला.

           तसेच भाजपा-शिवसेनेच्या युतीत एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे भागीदार आहेत. राज ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात चांगली कामगिरी केली तर समोर बघू. राज ठाकरेंसोबत आमचे मधुर संबंध आहेत. व्यक्तिगत संबंधात राजकारण येत नाही. राज ठाकरेंना मी लवकरच भेटण्यासाठी जाणार आहे. प्रत्येक पक्षाची आपली स्वतःची भूमिका असते. राज ठाकरेंच्या भूमिकेवर राज्यातील जनता कसा प्रतिसाद देणार हे आम्ही आताच सांगू शकत नाही. मनसेला सोबत घेण्याबाबत आज कुठलेही विधान करू शकत नाही. जसजशी परिस्थिती निर्माण होईल त्यानुसार निर्णय घेतला जाऊ शकतो, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

          दरम्यान, गेल्या काही काळापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची आक्रमक भूमिका स्वीकारल्याचे दिसून येत आहे. अलीकडेच भाजपा नेत्या नुपूर शर्मा यांनी पैगंबराबाबत वादग्रस्त विधान केले होते. या विधानानंतर देशासह जगभरातून शर्मा यांच्याविरोधात संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर नुपूर शर्मा यांना भाजपाने पक्षातून काढून टाकले. त्यानंतर राज ठाकरे यांनी नुपूर शर्मा यांचे थेट समर्थन केले. जे इस्लाम धर्मप्रचारक झाकीर नाईक बोलतो तेच नुपूर शर्मा बोलल्या. त्यात त्यांचे चुकले कुठे? असा प्रश्न राज यांनी प्रखरपणे उपस्थित केला होता.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने