'कॅग'कडून अजित पवारांचं अचूक नियोजन,आर्थिक शिस्तीचं कौतुक


 


मुंबई : कोरोनाचा भयाण काळ, सर्वत्र लॉकडाऊन, उद्योगधंद्यावर मंदीचं सावट अशा बिकट परिस्थितीत राज्याचा आर्थिक गाडा यशस्वीपणे हाकणाऱ्या तत्कालीन अर्थमंत्री अजित पवारयांचं कॅगच्या अहवालात कौतुक करण्यात आलं आहे. कोरोना काळात राज्याचा जीडीपी  घटला असला तरी राज्याची राजकोषीय तूट (Fiscal Deficit) कमी करण्यात राज्य सरकारला यश आल्याचं अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय. २०२१-२०२२ मध्ये राजकोषीय तूट ३ टक्क्यांच्या खाली आणण्यात राज्य सरकारला यश आलं. यामध्ये अजित पवार यांचा महत्त्वपूर्ण वाटा राहिला.

         राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज सभागृहात कॅगचा अहवाल सादर करण्यात आला. राज्यातील खर्चाचा लेखाजोखा मांडणाऱ्या कॅगच्या अहवालातून अनेक मुद्दे समोर आले. यातील गंभीर मुद्दा म्हणजे २०१६-२०१७ साली राज्यावरचं कर्ज ४ लाख कोटी होतं. ते सध्या ५ लाख ४८ हजार १७६ कोटींवर गेलंय तर कोरोना काळात राज्याचा जीडीपी ३ टक्क्यांनी घटला असल्याचं अहवालातून समोर आलंय.

     कोरोना काळात सगळ्याच क्षेत्रांना फटका बसल्याने उद्योग आणि सेवा क्षेत्रात अपेक्षेप्रमाणे वाढ झालेली नाहीये. लॉकडाऊनमुळे उद्योग आणि सेवा क्षेत्रात कमालाची घट झालेली पाहायला मिळतीये. त्याचवेळी कोरोना काळातही राज्यातला बळीराजा शेतात घाम गाळत असल्याने राज्याला कृषी क्षेत्राने तारलं असल्याची माहिती कॅगच्या अहवालातून समोर आलीय. अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे कृषी क्षेत्रात १३ टक्क्यांची वाढ झालेली आहे. दुसरीकडे राज्याच्या जीएसटीमध्ये १५.३२ टक्के तर व्हॅटमध्ये १२.२४ टक्के इतकी घट झालेली आहे.

 

कॅगच्या अहवालातील सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे :

   राजकोषीय तूट ३ टक्क्यांच्या खाली आणण्यात राज्य सरकारला यश

कोरोना काळात राज्याचा जीडीपी ३ टक्क्यांनी घटला

उद्योग सेवा क्षेत्रात घट, कृषी क्षेत्राने तारलं, १३ टक्क्यांची वाढ

जीएसटीमध्ये १५.३२ टक्के तर व्हॅटमध्ये १२.२४ टक्के इतकी घट

राज्यावरचं कर्ज २०१६-२०१७ साली ४ लाख कोटी होती, सध्या ५ लाख ४८ हजार १७६ कोटींवर गेलंय

-----------------

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने