पवारांनी जास्त उन्हाळे पावसाळे पाहिलेत कमीपणा वाटून घेऊ नका; सत्तरानी पवारसाहेबांचा सल्ला घ्यावा


ब्युरो टीम:  विधिमंडळाचा दुसऱ्या दिवस आज विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी आपल्या तडाखेबंद भाषणाने गाजवला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अजित पवार सरकारला सुनावत असताना मधेच सरकारमधील मंत्री शंभुराज देसाई त्यांना अडथळा आणत होते. त्याचवेळी अजित पवारांनी आपल्या शैलीत देसाईंना थेट थांबा. मधे बोलू नका, असे म्हणत झापले.

     विशेष म्हणजे शिंदे सरकारच काय तर अब्दुल सत्तार यांनी शरद पवार अथवा इतर कृषिक्षेत्रातील जाणकारांचा सल्ला घ्यावा आणि शेतकऱ्यांत विश्वास निर्माण करावा असेही सांगितले.

शंभूराज जरा थांबा, ऐका

     कृत्रिम पावसावर अजित पवार त्यांच्या सत्ताकाळातील उदाहरण देत होते. त्यावेळी शंभूराज देसाई यांनी भाषणात अडथळा आणला. त्यावर अजित पवार यांनी ''थांबा ऐका जरा. एक मिनिट, आपण एकत्र काम केले शंभूराजे, बोलताना मधे बोलायचे नसते. पाऊस चांगला झाला. कशाचा दुष्काळ, ओला दुष्काळ आहे ना..मी उदाहरण देत होतो. त्याकाळात कृत्रिम पाऊस पाडताना तुमच्याच मतदारसंघात खोडा आणला जात होता. आम्ही शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न करीत होतो आता काय होत आहे हे बघा.

सत्तार तुम्ही पवारांचा सल्ला घ्या

     अजित पवार म्हणाले, अब्दुल सत्तार तुम्ही आता कृषिमंत्री आहात, तुमच्याकडून प्रचंड अपेक्षा आहे. तुम्ही एकदा शरद पवार यांना जावून भेटा, त्यांचा सल्ला घ्या. आधीचे कृषिमंत्री दादा भुसेही भेटत होते. त्यात कमीपणा वाटायचे कारण नाही. त्यांनीही दहा वर्षांत देशाला अन्यधान्यात कसे स्वंयपूर्ण केले आहे. त्यांनी जास्त उन्हाळे, पावसाळे पाहिले आहेत. त्यांच्याकडे अनुभव आहे. महाराष्ट्र त्यांना बारकाईने माहित आहे. केवळ शरद पवारच नाही तर जाणकार तज्ज्ञांना भेटा.

शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करा

     सरकार आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना उद्देशून अजित पवार म्हणाले, धोरण राबवत असताना बळीराजा, शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करा. तुम्ही शेतकऱ्यांचे तारणहार आहात असा विश्वास शेतकऱ्यांत निर्माण करा, ज्यांच्याकडून शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकेल त्यांना भेटा, एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, यासाठी प्रयत्न करा. तुम्ही तातडीने याबाबत कारवाईही करा.

ते तर मुख्यमंत्र्यांचे कामच

     विधिमंडळात आज अजित पवार भाषण करण्यासाठी उठले, त्यानंतर त्यांनी आधी मुख्यमंत्र्यांवर आसुड ओढला. त्यांनाही शालजोड्यातून फटके मारले. नुकसानग्रस्त भागाचा दौरा मुख्यमंत्र्यांनी केला त्यात मोठी गोष्ट नाही, ते मुख्यमंत्र्यांचे कामच आहे, अशी फटकार लगावली.​​

मुख्यमंत्र्यांना फटकार

      अजित पवार म्हणाले, राज्यात शेतकऱ्यांची स्थिती अतिृवृष्टीमुळे दयनिय झाली. सर्वत्र अतोनात नुकसान झाले, पण सरकारकडून तुलनात्मक मदतीचा गवगवा करीत आहे, परंतु ती मदत तुटपुंजी आहे. शेतकऱ्यांचा खर्च हेक्टरी 11 हजार झाला आणि मदत हेक्टरी 13 हजार रुपये याला मदत म्हणत नाही.

मंत्री सत्कारात दंग

     अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री महोदय राज्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना दौऱ्यावर जाताना तुमचे मंत्री हार क्रेनने घालत होते, फोटोसेशन करून सत्कार स्वीकारत होते. ही परिस्थिती आहे. हरिभाऊ बागडेंनीही हे मान्य करावे लागेल. तुम्ही बसून का बोलत आहात. सगळे केस तुमचे माझे गेले. 45 दिवसात 137 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

मुख्यमंत्र्यांची मदत तुटपुंजी

   अजित पवार म्हणाले, मी राजकीय दृष्टीकोन ठेवून बोललो नाही. आम्ही याआधीही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपालांना भेटलो. मुख्यमंत्र्यांची मदत तुटपुंजी आहे. हेक्टरी 75 हजार पिकांसाठी तर फळबागांसाठी हेक्टरी दीड लाख रुपये मदत जाहीर करावी, तीन ऐवजी चार हेक्टरपर्यंत मदत द्यावी.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने