सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील आंबेघर खालचे, आंबेघर वरचे, ढोकावळे, मिरगाव, हुंबरळी, शिद्रुकवाडी, जितकरवाडी (जिंती) या सात गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्यासाठी ४ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
मंत्रालयातील मुख्यमंत्री समिती कक्षात पाटण विधानसभा मतदार संघातील अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या बाधित गावांच्या पुनर्वसनाबाबत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी बैठकीला आमदार शंभूराज देसाई, अपर मुख्य सचिव (महसूल) नितीन करीर, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिम कुमार गुप्ता, वित्त विभागाच्या सचिव ए. शैला, सातारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पाटणचे उपविभागीय अधिकारी सुनिल गाडे यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या आंबेघर खालचे आंबेघर वरचे, ढोकावळे, मिरगाव, हुंबरळी, शिद्रुकवाडी, जितकरवाडी (जिंती) या ७ गावांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याच्या अनुषंगाने खाजगी जमीन खरेदी करण्याकरीता तातडीने कार्यवाही करण्यात यावी. तसेच या गावांमध्ये नव्याने ५५० घरे उभारण्याच्या कामाला गती देण्यात यावी. या गावांचा कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने व गतीने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी बैठकीत दिले.
|
टिप्पणी पोस्ट करा