“छातीवर हात आपटून बोलू नका”; नीलम गोऱ्हे गुलाबराव पाटलांवर भडकल्या



ब्युरो टीम
:मुंबई : राज्यात कालपासून पावसाळी अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षातील नेते चांगलेच आक्रमक झाले. सलग दुसऱ्या दिवशी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज सुरु असतानाही विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. यातच उपसाभापती नीलम गोऱ्हे या मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर संतापल्या आणि त्यांना कडक शब्दात खडसावलं.

       सभागृहात एका प्रश्नाचं उत्तर देत असताना मंत्री गुलाबराव पाटील हे जास्तच आक्रमक झाले होते. हा प्रश्न शिक्षण खात्याशी संबंधित होता. तरी देखील गुलाबराव पाटील हे मोठ्या आवाजात उलटप्रश्न करत होते. त्यावरून उपसाभापती नीलम गोऱ्हे यांनी त्यांना शांत राहण्याची सूचना केली. तरीही पाटील हे बोलतच होते. त्यावरून गोऱ्हे यांचा संयम सुटला आणि त्यांनी पाटलांना खडे बोल सुनावले. “मंत्री महोदय तुम्ही खाली बसा, हा तुमच्या खात्याशी संबंधित प्रश्न नाही. त्यामुळे उगाच कशाला छातीवर हात आपटून आपटून बोलताय. मला सभागृहाचं कामकाज चालवायचं आहे. हि काय पद्धत झाली का बोलायची? तुम्ही काय कोणत्या चौकात उभे आहात का? परत परत ताकीद देऊनही तुम्ही ऐकत नाही. तुम्ही आधी खाली बसा.” अशा शब्दात गोऱ्हे यांनी पाटलांना खडसावलं.

अजित पवार सावंतांवर चिडले

    पालघरमधल्या बालकांच्या हत्तीरोगावरुन अजित पवारांनी विचारलेल्या प्रश्नाचं आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना उत्तर देता आलं नाही. आपण महत्वाचा प्रश्न उपस्थित केलाय. पण मी अधिक माहिती घेतो आणि तासाभरात त्याचं उत्तर देतो. तसेच माहिती एक तासात मिळेल असं वाटतं नाही. जर तसं झालंच तर हा प्रश्न आपण सोमवारी सभागृहात मांडू, असंही सावंत म्हणाले आहेत. यानंतर तासाभरात उत्तर देतो असं म्हटल्यावर विरोधक आक्रमक झाले. यानंतर अजित पवार म्हणाले कि, आम्ही इतका महत्वाचा प्रश्न मांडला अन् आरोग्य मंत्र्यांना त्याचं उत्तर माहिती नसावं, असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने