भाजपला मिळणार कडवे आव्हान;गुजरातमध्ये 'आप'चे सहावे आश्वासन

 

ब्युरो टीम: : आम आदमी पक्षाने (आप) गुजरातसाठी सहावे निवडणूक आश्वासन दिले आहे. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची ही सहावी घोषणा शिक्षणाच्या हमीची आहे. अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमध्ये जन्मलेल्या प्रत्येक मुलाला मोफत आणि चांगले शिक्षण दिले जाईल, अशी घोषणा केली आहे. सरकारी शाळा आलिशान बनवल्या जातील आणि नवीन सरकारी शाळा मोठ्या प्रमाणावर उघडल्या जातील, असंही म्हटलं

     अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमधील सर्व खाजगी शाळांचे ऑडिट केले जाईल, ज्यांनी जास्त फी घेतली आहे त्यांना परत केले जाईल आणि कोणत्याही शाळेला बेकायदेशीरपणे फी वाढ करू दिली जाणार नाही, असं म्हटलं आहे. तसेच. शासनाची परवानगी घेऊनच सर्व शाळांना फी वाढ करता येणार आहे. सर्व हंगामी शिक्षक कायमस्वरुपी केले जातील आणि नवीन रिक्त पदेही काढली जातील. कोणत्याही शिक्षकाला अध्यापन सोडून इतर कोणतेही कर्तव्य दिले जाणार नसल्याचं केजरीवाल यांनी स्पष्ट केलं. गुजरातमधील भुज येथे झालेल्या टाऊन हॉल बैठकीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली.

      काही दिवसांपूर्वीच अरविंद केजरीवाल यांनी गुजरातच्या जामनगर येथे झालेल्या सभेत व्यापाऱ्यांना पाच आश्वासनं दिली होती. आम आदमी पक्षाचे सरकार आल्यास ते गुजरातच्या विकासात व्यापाऱ्यांना भागीदार बनवतील. व्यापाऱ्यांमधील भीतीचे वातावरण संपवून त्यांना सन्मान देऊ. लाल फितीचं राज्य संपवू, कर्जमाफी योजना आणून व्हॅट प्रकरणे संपवू आणि व्हॅटचे प्रलंबित परतावे सहा महिन्यांत देऊ.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने