एसटी महामंडळाकडून अद्याप कार्डचे वाटपच नाही; सवलत प्रवास योजना

 


    पुणे: -राज्य परिवहन महामंडळातर्फे पुणे विभागात तीन वर्षांत पावणेतीन लाख ज्येष्ठ नागरिकांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असून, एक लाख 85 हजार नागरिकांना स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले आहे.

अद्याप एक लाख दोन हजार 93 नागरिकांना स्मार्ट कार्ड मिळाले नसून, त्यांना एसटी स्थानकावर हेलपाटे मारावे लागत आहेत.

      एसटी महामंडळाकडून पूर्वी देण्यात येणारे कागदी पास बंद करून 1 जून 2019 पासून स्मार्ट कार्ड योजना अमलात आणली. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, अंध व्यक्ती, स्वातंत्र्यसैनिक, दिव्यांग आदींचा स्मार्ट कार्ड योजनेत समावेश आहे. 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटीचा प्रवास करण्यासाठी 50 टक्के सवलत देण्यात येते, तर शिवनेरी बसमध्ये 40 टक्के बस सवलत दिली जाते. पुणे विभागात एकूण 13 डेपो असून, त्यातील 11 डेपोमध्ये स्मार्ट कार्ड देण्याची सुविधा आहे.

आधार कार्डद्वारे 31 ऑगस्टपर्यंत प्रवास

      एसटी प्रशासनाने 31 ऑगस्टपर्यंत ज्येष्ठ नागरिकांना आधार कार्ड दाखवून प्रवास करण्याची सवलत दिली आहे; पण त्यानंतर मात्र स्मार्टकार्ड दाखवूनच प्रवास करावा लागणार आहे. पण मागील दीड महिन्यापासून नोंदणी बंद असल्याने आठ दिवसांत नोंदणी कशी होणार, असा सवाल ज्येष्ठ नागरिकांकडून केला जात आहे.

दीड महिन्यापासून योजना बंद

        महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसह विविध घटकांना प्रवास भाड्यात सवलत देण्यासाठी स्मार्ट कार्ड योजना आणली. मात्र, गेल्या दीड 

 महिन्यापासून नवीन स्मार्ट कार्ड नोंदणी, नूतनीकरणाचे काम ठप्प झाले आहे. त्याचा फटका ज्येष्ठ नागरिकांना बसला असून, नागरिकांना स्थानकावर फेऱ्या माराव्या लागत आहेत. स्मार्ट कार्डचे काम पाहणाऱ्या कंत्राटदाराची मुदत जून 2022 मध्ये संपुष्टात आली असल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

मोफतचा अध्यादेश नाही

       मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्राच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी प्रवास मोफत देण्याची घोषणा केली होती; पण याचा अद्याप शासनाने कोणताही अध्यादेश काढला नसल्याने ज्येष्ठ नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच अध्यादेश काढला नसल्याने एसटी प्रशासनाकडून 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांकडून तिकीट घेतले जात आहे.


सद्यस्थिती अशी

एकूण नोंदणी

2,87,787

स्मार्ट कार्ड वाटप

1,85,694

कार्डवाटप नाही

1,02,093

------------

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने