‘देशाचं नाव बदला … पंतप्रधान मोदींना ’ मोहम्मद शमीच्या पत्नीचं आवाहन


ब्युरो टीम: आज देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. या निमित्त देशभरातील सेलिब्रिटिंनीदेखील नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या दरम्यान, भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँने पंतप्रधांना नरेंद्र मोदींना एक आवाहन केले आहे. तिच्या या आवाहनामुळे ती पुन्ही एकदा चर्चेत आली आहे.

     हसीन जहाँने शमीवर अनेक गंभीर आरोप केले होते. तेव्हापासून ती सतत काहीना काही कारणाने चर्चेत असते. आता तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाचे नाव बदलण्याचे आवाहन केले आहे. हसीन जहाँने तिच्या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा यांना देशाचे नाव बदलण्याचे आवाहन केले आहे. हसीनने ‘इंडिया’ या नावावर आक्षेप घेतला आहे.

    इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हसीन जहाँने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तीन मुली पांढरा पोषाख घालून नृत्य करत आहेत. त्यांनी तिरंगी रंगाची ओढणी घेतलेली असून त्या ‘देश रंगीला’ या गाण्यावर नृत्य करत आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये हसीन जहाँने लिहिले, “आपला देश, आपला अभिमान. माझं भारतावर प्रेम आहे. आपल्या देशाचे नाव भारत किंवा हिंदुस्थान असावे. मी माननीय पंतप्रधान आणि माननीय गृहमंत्री यांना देशाचे नाव बदलण्याची विनंती करते. जेणेकरून जगभरात आपल्या देशाला ‘भारत किंवा हिंदुस्थान’ म्हटले जाईल इंडिया नाही.”

      हसीनने पंतप्रधानांना केलेले आवाहन बघून ती पुन्हा चर्चेत आली आहे. तिच्या या मागणीमागे काय कारण आहे, हेही स्पष्ट झालेले नाही. हसीन जहाँ आणि मोहम्मद शमी यांचा २०१४ मध्ये विवाह झाला होता. यानंतर, २०१८ मध्ये हसीन जहाँने शमीवर घरगुती हिंसाचार आणि मॅच फिक्सिंगसह अनेक गंभीर आरोप केले. मात्र, बीसीसीआयने तपासात शमीला निर्दोष ठरवले असून तो देशासाठी खेळत आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने