अमरावती : नागपूर-मुंबई
समृद्धी महामार्गाच्या कडेला असलेल्या भिंतीमुळे शेतकऱ्यांचे वहिवाटीचे रस्ते बंद
झाल्याने पिकांचे नुकसान होत आहे. परिणामी, २२ शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. नागपूर-मुंबई या
समृद्धी महामार्गावरील चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेल्या रस्त्याच्या शेजारील
भिंतीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी पीक पेरणी व्हायच्या
आधीपासूनच नांदगाव खंडेश्वर येथील तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांना निवेदनाद्वारे
भिंतीमुळे शेतीचे वहिवाटीचे रस्ते बंद झाल्याने त्या रस्त्यांना मोकळे करण्याबाबत
निवेदन सादर केले होते. पीक पेरणी केली तेव्हापासून शेतीत जायला रस्ताच नसल्याने
मोठय़ा प्रमाणात शेत मालाची नासाडी होत आहे. आता पीक जेमतेम काढणीचा हंगाम जवळच
असल्याने आता तरी रस्ते मोकळे करावे, असे निवेदन शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना पुन्हा नव्याने दिले
आहे. जर रस्ते लवकरात लवकर मोकळे न झाल्यास २२ शेतकरी आत्मदहन करणार असल्याचा
इशारा यावेळी शेलू नटवा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.
निवेदन देताना शेतकरी अमित भोयर,
राजू चौधरी, महादेव शेंडे, महेंद्र धनवीज, प्रभाकर पाचपुते,
सविता दरणे, अरुण भोयर, प्रसन्न
सव्वालाखे, दिगांबर चौधरी, केशव चौधरी, सुयोग भोयर, शंकर गोंढाणे,
उत्तम तलवारे, महादेव गोंढाणे, मुक्ताई शिंदे, कैलास गोंढाणे,
विलास भोयर, सुभाष भोयर, प्रवीण भोयर,
मििलद डुबे, रामेश्वर डुबे उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा