ब्युरो टीम: राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते भाजपच्या रडावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या विधिमंडळ अधिवेशनात भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज्यात खळबळ उडवून दिली. यानंतर रोहित पवारांनाही लक्ष्य करण्यात आले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी रोहित पवार यांची बाजू सावरत भाजपलाच सुनावले आहे.
भाजप नेते मोहित कंबोज मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवारांवर विविध प्रकारचे आरोप करत आहेत. अलीकडेच एक ट्वीट करत रोहित पवार यांच्या कंपनीचा आपण अभ्यास करत असून लवकरच सविस्तर अहवाल सादर करू, असा इशारा दिला होता. यावरून राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा वाद निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांनी आढावा बैठक घेतली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवारांवर होत असलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली.
यांच्याबद्दल जनताच योग्यवेळी निर्णय घेईल
रोहित पवारांचे काय होणार? याची भविष्यवाणी भाजप नेत्यांनी आधीच केली आहे. याबाबत कोणतीही चौकशी झाली नाही, पण भाजप नेते त्याआधीच असे होणार, तसे होणार, अशी वक्तव्ये करत आहेत. ते सांगत असतात की, यांच्या घरावर धाड पडणार, यांचे अमुक होणार, त्यांचे तमुक होणार, आपल्याला कुठूनतरी अधिकृत माहिती मिळाली आहे, असा भास निर्माण करून भाष्य करणारा एक वर्ग महाराष्ट्रात निर्माण झाला आहे. पण यांच्याबद्दल लोकं योग्यवेळी निर्णय घेतील, असा इशारा शरद पवार यांनी दिला.
सरकारविरोधी जनमत तयार करण्यासाठी लढा उभारणार
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, माणसे फोडणे, साधनांचा गैरवापर करणे आणि ईडीसारख्या यंत्रणांचा वापर करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे गंभीर चित्र या देशासमोर दिसत आहे. त्यामुळे देशातील बिगरभाजप पक्षांच्या नेत्यांशी सुसंवाद साधून लोकशाही मार्गाने आलेली सरकारे पाडण्याचे जे कृत्य सुरू आहे त्याविरोधात जनमत तयार करण्यासाठी लढा उभा करण्याचा आम्ही विचार करत आहोत, असे शरद पवार म्हणाले.
दरम्यान, लवकरच काही जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. त्याची सुरुवात ठाण्यापासून करणार आहे. कारण ठाण्यावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे, असे सूचक वक्तव्य शरद पवार यांनी ठाण्यातच केले. केंद्रातील भाजप सरकारने याआधी देशवासियांना दिलेली अनेक आश्वासने पूर्ण केली नसल्याचे सांगत आपण लवकरच राज्यातील काही जिल्ह्यांचा दौरा करून आढाव घेणार आहोत, अशी माहिती पवार यांनी दिली आहे.
टिप्पणी पोस्ट करा