मुंबई: विधीमंडळाच्या कामकाजाला 17 तारखेपासून सुरुवात झाली. शिंदे गट आणि भाजपच्या सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचे सगळे आमदार विधीमंडळाच्या पायऱ्यांवर जमा झाले होते.
ओला दुष्काळ जाहीर करा, संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदत करा अशा मागण्या विरोधक करत होते. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे हे घोषणा देत होते आणि इतर आमदार त्यांना साथ देत होते.
धनंजय मुंडे यांनी अचानक दिलेल्या एका घोषणेमुळे महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये हशा पिकला होता. झालं असं की धनंजय मुंडे घोषणा देत असताना त्यांना समोरून संजय शिरसाट येताना दिसले. त्यांना पाहताच धनंजय मुंडे यांनी घोषणा दिली की, 'अरे संजय शिरसाटला मंत्रिपदं न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो.' शिरसाट गेल्यानंतर काहीवेळाने तिथे आशिष शेलार आले. त्यांना पाहिल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पुन्हा तशीच घोषणा दिली. शेलार यांनी हात उंचावून दाखवत सभागृहाची वाट धरली होती.
50 खोके, ओक्के…, 'ईडी सरकार हाय हाय'च्या घोषणा
'ओला दुष्काळ जाहीर करा, अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा', ' ईडी सरकार हाय हाय', 'या सरकारचे करायचे का, खाली डोके वर पाय', 'आले रे आले, 50 खोके आले', 'खोके घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो', 'स्थगिती सरकार हाय हाय', 'करून महाराष्ट्राशी गद्दारी, सत्तेत आली शिंदेची स्वारी', अशा गगनभेदी घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.
टिप्पणी पोस्ट करा