गद्दार म्‍हणणाऱ्यांना निवडणुकांत धडा शिकवू - भरत गोगावले



ब्युरो टीम: - शिवसेनेतून बाहेर पडलेले चाळीस आमदार आणि बारा खासदार कोणत्याही पक्षात गेलेले नाहीत किंवा नवीन पक्षही स्थापन केलेला नाही. आम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी आजही प्रामाणिक आहोत. त्यामुळे आम्ही गद्दार कसे हे दाखवावे, आम्हाला गद्दार म्हणणाऱ्यांना आगामी निवडणुकांमध्ये धडा शिकवणार, असा इशारा आमदार तथा शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी दिला. आदित्य ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या रायगड दौऱ्यानंतर आमदार भरत गोगावले यांनी आदित्य ठाकरे आणि माजी मंत्री अनंत गीते यांच्यावर चांगलीच तोफ डागली.

        महाडमधील सभेत ठाकरे यांनी भरत गोगावले यांच्यावर जोरदार टीका केली होती. शिवसेना सोडून गेलेल्यांचा ‘गद्दार’ असा उल्लेख करत भविष्यात या आमदारांना विधानसभेची पायरी चढू दिली जाणार नाही, असा इशाराही दिला होता. यामुळे भरत गोगावले यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरे यांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले. या वेळी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, नितीन पावले उपस्थित होते.

      आम्हाला तत्त्व पटली नाही म्हणून हा निर्णय घेतला असून मूळ शिवसैनिक देखील आमच्या बरोबर असल्याचा दावा गोगावले यांनी केला. आमचे सरकार हे सामान्य माणसाला बरोबर घेऊन जाणारे सरकार असून आम्ही कामे करतो म्हणून तळागाळातील माणूस आमच्याबरोबर आहे. त्यामुळे काम करणाऱ्यांबरोबर राहायचे की कामचुकारांबरोबरच, हे जनताच ठरवेल, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

        अनंत गीते यांच्याशी आपण प्रामाणिक राहिल्यानेच ते कायम निवडून येत असल्याचे गोगावले यांनी नमूद केले. त्यामुळे ते आम्हाला काय धडा शिकवण्याची भाषा करतात. दहा वर्षे केंद्रीय मंत्री राहिलेल्या अनंत गीते यांनी दहा मुले तरी कामाला लावली का, याचे उत्तर प्रथम द्यावे. यापुढे कसे निवडून येता ते देखील आम्ही पाहतो, असा इशाराही त्‍यांनी गीते यांना दिला.

७४ कोटी ६० लाखांचे कामे मंजूर

      सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, सर्वसामान्य माणसाशी निगडित निर्णय घेऊन न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळेच अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाड, माणगाव आणि पोलादपूर मतदार संघाकरिता जवळपास ७४ कोटी ६० लाख रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. या कामांची यादीच आमदार गोगावले यांनी सादर केली. तसेच जलजीवन मिशनमधून ३२ कोटी रुपये मंजूर केले असून महाडमधील एनडीआरएफ पथक, धरणांची कामे, प्रशासकीय भवन, शिवसृष्टी ही कामे मार्गी लावली जातील असे आश्वासनही त्‍यांनी दिले.

---------


  


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने