संहिता माझ्यासाठी खूप महत्त्वाची - अमृता सुभाष

 



ब्युरो टीम: मराठी मनोरंजनविश्वातील गुणी अभिनेत्रींपैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे अमृता सुभाष. वैविध्यपूर्ण माध्यमांमधून ती सातत्यानं प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. नुकत्याच आलेल्या 'सास बहू आचार प्रायव्हेट लिमिटेड' या सीरिज आणि 'पुन:श्च हनिमून' या नाटकाच्या निमित्तानं तिच्याशी संवाद साधला.

      वैविध्यपूर्ण आणि लक्षवेधी भूमिकांमुळे अभिनेत्री अमृता सुभाष नेहमी लक्षात राहते. मालिका, सिनेमा, नाटक, वेब सीरिज असं कोणंतही माध्यम असो ती तिच्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवतेच. तिचं अभिनयकौशल्य मराठी सिनेसृष्टीपुरतं मर्यादित न राहता हिंदीतही नावाजलं गेलंय. 'सॅक्रेड गेम्स', 'बॉम्बे बेगम्स' या लोकप्रिय सीरिज तर 'गली बॉय', 'धमाका' या सिनेमांमुळे अमृता अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. सहजसुंदर अभिनयामुळे तिची मराठी-हिंदीसिनेसृष्टीत नेहमीच दखल घेतली जाते

संहिता महत्त्वाची

कुठलीही भूमिका निवडताना माझी अशी काही ठरलेली गणितं नाहीत. एखादी भूमिका मुख्य आहे किंवा सहकलाकाराची यापेक्षा त्याची संहिता माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. स्वतःला प्रेक्षकांच्या खुर्चीत ठेवून मी त्या पूर्ण भूमिकेच्या प्रवासाचा विचार करते आणि ते आवडलं तरच त्यासाठी होकार देते.

    बदल पाहणं समाधानकारक

'पुन:श्च हनिमून' हे नाटक एका जोडप्याचं असल्यानं अनेक जोडपी नाटक पाहायला येतात, कौतुक करतात. पण हे नाटक मानसिक आरोग्यावरही भाष्य करतं. आजही पुरुषांना मुक्तपणे रडण्याचं म्हणावं तितकं स्वातंत्र्य नाही; त्यामुळे ते किती गरजेचं आहे या विषयावर नाटकात भाष्य केल्यावर अगदी नाट्यगृहातही काही पुरुष पहिल्यांदा मोकळेपणानं रडले अशा अनेक प्रतिक्रिया आम्हाला मिळाल्या. त्यामुळे नाटक आवडतंय यापेक्षा अशाप्रकारे घडणारा बदल पाहणं समधानकारक आहे.

सुमनसाठी भाषा शिकले

'सास बहु आचार प्रायव्हेट लिमिटेड'मध्ये मी साकारत असलेलं सुमन हे पात्र मुख्य दिल्ली ६मध्ये राहणारं आहे. त्यामुळे ते साकारण्यासाठी मला तिकडचा योग्य लहेजा, भाषा शिकणं आवश्यक होतं. भूमिकेसाठी मी तिकडेच राहिलेल्या आणि लहानाचा मोठा झालेल्या प्रतिककडून ती भाषा शिकले. या भाषेविषयी आधी मनात भीती असली तरीही अनेक मराठी आणि दिल्लीच्या लोकांनीसुद्धा माझ्या त्या भाषेवर दाद दिली याचा खूप आनंद आहे.

लॉकडाउनमध्ये नाटक मिस केलं

        नाटक हे माझं आवडतं माध्यम आहे. प्रत्यक्ष मिळणारी दाद, टाळ्या, भरलेलं नाट्यगृह, बॅकस्टेजला येऊन लोकांनी केलेलं कौतुक या सगळ्याची खूप आठवण येत होती. लॉकडाउनमुळे या सगळ्या गोष्टींची किंमत समजली. कुठल्याही कलाकाराला नव्यानं काम करण्यासाठी ऊर्जा मिळवायची असेल तर नाटकाइतका दुसरा उत्तम पर्याय नाही.

महिलाकेंद्रित भूमिका करायला आवडेल

       महिलाकेंद्रित भूमिका हल्ली पुढे येताना दिसताहेत. त्या तशाच पुढे येत राहाव्यात हीच इच्छा आहे. हल्ली अशा भूमिका मराठी, हिंदी सगळीकडेच पाहायला मिळतात याचा आनंद आहेच. माझ्याबाबतीत सुमनसारखी अप्रतिम भूमिका, अपूर्व सिंग करकीसारखा दिग्दर्शक आणि टीव्हीएफसारखं प्रोडक्शन हा सगळा योग जुळून आला; त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. यापुढेही महिलाकेंद्रित भूमिका करायला मला नक्कीच आवडेल.

नाटकाला विशेष दाद

      ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी आमच्या नाटकाला हजेरी लावली होती. त्यांच्या कौतुकाची थाप पाठीवर पडणं ही भावना खूप सुखावह आहे. त्यांनी दिलेल्या शाबासकीनं काम करण्याची ऊर्जा वाढते. माझे गुरू नसिरुद्दिन शाह हेसुद्धा माझ्या कामावर नेहमीच नजर ठेवून असतात. त्यांचं मार्गदर्शन, शिकवण हेच मी नेहमी लक्षात ठेवत आले आहे.

------------

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने