ब्युरो टीम: तेजस ठाकरे पाली, सरडे शोधता शोधता राजकारणात आले, त्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुलगा म्हणून फुकटात मंत्री पद मिळेल, पण त्यांचे तेवढे कर्तृत्व नाही, अशा शब्दात भाजप नेते निलेश राणे यांनी जळजळीत टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांचे धाकटा मुलगा तेजस ठाकरे राजकारणार प्रवेश करण्याची राजकीय गोटात चर्चा सुरु आहे. यात तेजस ठाकरेंच्या वाढदिवशीच त्यांच्या राजकीय प्रवेशाची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र तेजस ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्य़ेला निलेश राणे यांनी जहरी टीकास्त्र डागले आहे.
तेजस ठाकरे पाली, सरडे शोधता शोधता राजकारणात आले, ठाकरेंनी सर्व महत्त्वाची पदं कुटुंबात ठेवली, त्यांनी बाहेरचं कोण चालत नाही, बाकीच्यांनी फक्त खुर्चा, टेबल उचलण्याचे काम करायचे. व्यक्ती किती शेंबडा असू दे आडनाव ठाकरे असेल तर तो मुख्य पदावर दिसेल, असा टोला निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
उद्धव ठाकरेंचा सुपूत्र म्हणून तेजस ठाकरे पदावर बसणार आणि उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जे कार्यकर्ते आहेत ते केवळ सतरंज्या टेबल, खुर्च्या उचलणार अन् घोषणा देणार… कार्यकर्त्यांनी सगळी कामं करायची पण पदं सगळी फक्त ठाकरेच घेणार. शिवसैनिकांवर होतात तश्या ठाकरेंवर केव्हा केस झाल्या आहेत का? याचा विचार करा आणि साथ किती दयायची ते ठरवा. कार्यकर्त्यांनो उद्धव ठाकरे तुमच्याबद्दल कधीच विचार करणार नाही. तुम्हालाच तुमच्याबद्दल विचार करावा लागेल, असा सल्ला निलेश राणे यांनी शिवसैनिकांना दिला.
टिप्पणी पोस्ट करा