ब्युरो टीम: कर्नाटकातील शिवमोगाइथं सोमवारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं छायाचित्र असलेला फलक लावण्यावरुन मोठा तणाव निर्माण झाला. या घटनेत एका तरुणावर धारदार शस्त्रानं वार करण्यात आले. तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्यानं परिसरात १४४ कलम लागू करण्यात आलंय. दरम्यान, चाकू हल्ला प्रकरणी कर्नाटक पोलिसांनी काल (मंगळवार) चार जणांना अटक केलीय.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं छायाचित्र असलेला फलक लावण्यास एका गटानं आक्षेप घेतला. त्या ठिकाणी टीपू सुल्तान यांचं छायाचित्र असलेला फलक लावण्याचा प्रयत्न या गटानं केला. त्यावरून दोन गटांत संघर्ष झाल्या होता. यावेळी गांधीनगर भागात एका युवकावर चाकू हल्ला करण्यात आला आहे. जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव प्रेमसिंह असं असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. शहरातील तणावपूर्व स्थिती पाहता प्रशासनानं तीन दिवसांसाठी शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय.
आतापर्यंत पोलिसांनी नदीम (25), अब्दुल रहमान (25) आणि जबीउल्लाह या चारपैकी तीन जणांची ओळख उघड केलीय. अटक करण्यात आलेल्या चौघांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 307 (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. अतिरिक्त पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी नदीमचा 2016 मध्ये शिवमोगा इथं गणेशाच्या मिरवणुकीत झालेल्या जातीय संघर्षात सहभाग होता, असं सांगितलंय. कर्नाटकचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांनी जखमी युवकाची भेट घेतली आहे. आरोपींवर तातडीनं कारवाई केली जाईल, असं आश्वासनही दिलंय. शिवमोगातील हल्ला हा सावरकर फलकाच्या वादाशी संबधित असावा असं दिसतं आहे. पण, अद्याप पूर्ण माहिती हाती आलेली नाही, अशी प्रतिक्रिया ज्ञानेंद्र यांनी दिलीय.
टिप्पणी पोस्ट करा