जर तुमच्याकडे फाटलेली किंवा टेपने चिटकवलेली नोट असेल आणि तुमच्याकडून ही नोट बाजारात, दुकानात, पेट्रोल पंपावर आदी ठिकाणी कोणीही घेत नसेल, तरीही तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. कारण या फाटलेल्या नोटेऐवजी तुम्हाला चांगली नोट मिळू शकते. कारण अशा नोटा बदलण्यासाठी आरबीआयने ( RBI ) नियम केले आहेत. बँकेच्या नियमांनुसार तुम्ही या नोटा कशा बदलू ( exchange ) शकता आणि तुम्हाला पूर्ण पैसे कसे परत मिळू शकतात, हे जाणून घेऊयात.
नोट बदलून देण्यास नकार दिल्यास करा तक्रार
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या 2017 च्या चलनी नोटा बदलण्याच्या नियमांनुसार, जर तुम्हाला एटीएममधून फाटलेल्या नोटा आल्या तर तुम्ही त्या सहज बदलू शकता. कोणतीही सरकारी बँक (PSB) नोटा बदलून देण्यास नकार देऊ शकत नाही. कोणत्याही बँकेने तुम्हाला फाटलेल्या नोटा बदलून देण्यास नकार दिल्यास, तुम्ही https://crcf.sbi.co.in/ या संकेतस्थळावर जाऊन ccf/ under General Banking// Cash Related category वर तक्रार करू शकता. ही लिंक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमसाठी आहे. कोणतीही बँक एटीएममधून आलेल्या फाटलेल्या नोटा बदलून देण्यास नकार देऊ शकत नाही. त्यानंतरही बँकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास बँक कर्मचाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. ग्राहकाच्या तक्रारीच्या आधारे बँकेला 10 हजारांपर्यंतचे नुकसानही भरावे लागू शकते.
अशी बदला नोट
तुमच्या नोटेचे तुकडे झाले तरी बँक ती बदलून देईल. फाटलेल्या नोटेचा काही भाग गहाळ असला तरी तो बदलून घेता येतो. यासाठी, एक फॉर्म भरून, तुम्ही सरकारी बँक, खासगी बँक किंवा आरबीआयच्या इश्यू ऑफिसमध्ये जाऊन नोट बदलू शकता. नोट बदलताना तुम्हाला पूर्ण पैसे परत मिळतील की नाही, हे तुमच्या नोटेची स्थिती आणि नोट मूल्यावर अवलंबून आहे. काही फाटलेल्या नोटांच्या बाबतीत, पूर्ण पैसे मिळतात. परंतु जर नोट जास्त फाटली तर तुम्हाला काही टक्के रक्कम परत मिळेल.
बँकेत जाऊन फाटलेल्या नोटा बदलणे शक्य आहे.त्यामुळे जर तुमच्याकडे फाटलेल्या नोटा असतील, तर तुम्ही स्वतःला मनस्ताप करून घेऊ नका. बँकेमध्ये जाऊन या नोटा बदला.
टिप्पणी पोस्ट करा