ब्युरो टीम: करोनाच्या संकटातून देशातील आर्थिक परिस्थिती सुधारत असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जुलैमध्ये झालेल्या एकूण जीएसटी संकलनात देशात तब्बल २२ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे या महिन्यात महाराष्ट्रातून सर्वाधिक म्हणजेच २२ हजार १२९ कोटी रुपयांचे जीएसटी संकलन करण्यात आल्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे. गेल्यावर्षी जुलैमध्ये राज्य़ातून १८ हजार ९९९ कोटी रुपये जीएसटी संकलित करण्यात आला होता. जीएसटी लागू झाल्यानंतरचा हा दुसरा सर्वाधिक महसूल आहे.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जुलै, २०२२मध्ये देशातून १ लाख ४८ हजार ९९५ कोटी रुपयांचा जीएसटी संकलित करण्यात आला आहे. त्यात केंद्राचा म्हणजेच सीजीएसटीचा हिस्सा २५ हजार ७५१ कोटी इतका असून, राज्यांमधील एसजीएसटीचा हिस्सा ३२,८०७ कोटी रुपये आहे. तर आयजीएसटी म्हणजे एकात्मिक वस्तू आणि सेवा कराचा हिस्सा ७९,५१८ कोटी रुपये आहे आणि उपकराच्या माध्यमातून १०,९२० कोटी रुपये महसूल प्राप्त झाला आहे. जुलैमध्ये वस्तूंच्या आयातीतून मिळणारा महसूल ४८ टक्के अधिक होता आणि देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) प्राप्त महसूल मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत या स्रोतांमधून मिळालेल्या महसुलापेक्षा २२ टक्के अधिक आहे.
जुलै, २०२२पर्यंत जीएसटी महसुलात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ३५ टक्के वाढ झाली आहे. जीएसटी परिषदेने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे जीएसटी संकलनात वाढ झाली आहे. महाराष्ट्रात गेल्या वर्षीच्या जुलै महिन्याच्या तुलनेत त्यात १७ टक्के वाढ झाली आहे. तर गोव्याच्या जीएसटी संकलनातही गेल्या वर्षीच्या जुलैच्या तुलनेत ४३ टक्के वाढ झाली असून, या जुलैमध्ये गोव्यात ४३३ कोटी रुपये इतका जीएसटी संकलित करण्यात आला आहे.
एकूण : १ लाख ४८ हजार ९९५ कोटी रु.
१. महाराष्ट्र : २२,१२८ कोटी रु.
२. कर्नाटक : ९,७९५ कोटी रु.
३. गुजरात : ९,१८३ कोटी रु.
इतर राज्यांतील जीएसटी संकलन
तमिळनाडू : ८,४४९ कोटी रु.
उत्तर प्रदेश : ७,०७४ कोटी रु.
हरयाणा : ६,७९१ कोटी रु.
तेलंगण : ४,५४७ कोटी रु.
पश्चिम बंगाल : ४,४४१ कोटी रु.
आंध्र प्रदेश : ३,४०९ कोटी
टिप्पणी पोस्ट करा