मनसेने मुंबई जिकंण्याची रणनीती आखण्यासाठी पुण्यातल्या संस्थेवर दिली जबाबदारी



मुंबई : आशियातली सर्वात श्रीमंत महापालिका म्हणजे मुंबई महापालिका. आपल्याच देशातील अनेक राज्यांचा अर्थसंकल्प नसतो इतका अर्थसंकल्प एकट्या मुंबई महापालिकेचा असतो. मुंबई महापालिका म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी अशी राजकीय वर्तुळात चर्चा केली जाते. त्यामुळे आता हीच सोन्याची कोंबडी मिळवण्यासाठी सर्व राजकीय पक्ष सज्ज झालेत. त्यात राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मागे राहिलेली दिसत नाही. मुंबई महापालिकेच्या निवडणुका येऊ घातल्यात. त्यामुळेच आता मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रणनीती आखण्यासाठी पुण्यातील ‘राज्यकर्ता’ या खासगी संस्थेला काम देण्यात आलंय.

        म्हणजे राज ठाकरेंनी ९ मार्च, २००६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करुन राजकारणात आपलं वेगळं बस्तान मांडलं. त्यानंतर २००९ साली पहिल्याच विधानसभा निवडणुकीत मनसेचे १३ आमदार निवडून आले तर २४ हून अधिक जागांवर त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली. त्यामुळे शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन आपला वेगळा पक्ष स्थापन केल्यानंतर सुरुवातीला राज ठाकरेंना प्रचंड प्रसिद्धी मिळाली.

       तर राज्यातील महापालिकांपैकी नाशिक महापालिकेवर १७ फेब्रुवारी २०२२ साली मनसेची पहिल्यांदा एकहाती सत्ता आली. नाशिककरांनी पहिल्यांदा राज ठाकरेंवर विश्वास दाखवला आणि मनसेकडे सत्तेची धुरा दिली. त्यानंतर मात्र मनसे अनेकदा किंगमेकरच्या भूमिकेत दिसली पण सत्ता मिळवू शकली नाही. त्यात आता मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील महापालिकांच्या निवडणुका येऊ घातल्यात. त्यादृष्टीनं मनसेनंही जय्यत तयारी सुरु केली आहे.

          मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनंही मनसे सज्ज झाली आहे. पुण्यातील ‘राज्यकर्ता’ या खासगी संस्थेला मनसेकडून वॉर्डनिहाय सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्यकर्ता ही संस्था मनसेसाठी मुंबईतील २२७ पैकी १०० वॉर्डांचं सर्वेक्षण करणार असल्याचं कळतंय. महापालिका निवडणुकीपर्यंत तीन टप्प्यात ही संस्था मनसेला सर्वेक्षणाचे अहवाल सादर करणार आहे. त्यात वॉर्डातील सध्याची राजकीय स्थिती, मतदारांची भूमिका, वॉर्डाचा विकास आणि नागरी समस्या सोडवण्यासाठी करावयाच्या आवश्यक उपाययोजना याबाबतची माहिती राज्यकर्ता या संस्थेकडून मनसेला सादर करण्यात येणार आहे.

        मनसेच्या २००६ ते २०२२ या १६ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबईतील वॉर्ड सर्वेक्षणाचं काम एका खासगी एजन्सीकडे देण्यात आलंय. या संस्थेकडून येणाऱ्या अहवालानुसार, निरीक्षणानुसार मनसे आपली रणनीती आखणार असल्याचं कळतंय. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला अपेक्षित यश मिळतं का हे पाहणं महत्वाचं असेल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने