अहमदनगर : कर्जत शहरात प्रतिक, उर्फ सनी राजेंद्र पवार या युवकावर गुरुवारी रात्री एका गटाने हल्ला केला. जुन्या भांडणाच्या कारणावरून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक चौकशीत सांगण्यात येत आहे. मात्र, पवार याने काही दिवसांपूर्वी भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्यामुळेच हा हल्ला झाल्याचा आरोप हिंदुत्वावादी संघटनांकडून करण्यात येत आहे. त्यासाठी कर्जत बंदची हाक देण्यात आली आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पवार याला नगरच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
ज्यांच्या बाबतीत ही घटना घडली आहे, त्यांच्यात पूर्वीही भांडणे झाली होती. त्यासंबंधीचे गुन्हेही पोलिसांत दाखल आहेत. त्याच वादातून रात्रीचा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नूपर शर्मा यांचे समर्थन करण्याशी याचा काही संबंध असल्याचे अद्याप तरी नेमकेपणाने स्पष्ट झालेले नाही. मात्र पोलीस संपूर्ण चौकशी करीत आहेत,’ अशी माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.
पोलिसांनी दखल घेत चौकशी सुरू केली आहे. मात्र, हा प्रकार शर्मा यांच्या समर्थनाच्या कारणावरूनच झाला किंवा कसे, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वी पवार याचे शहरातील पठाण नावाच्या एका युवकासोबत भांडण झाले होते. मारहाणही झाली होती. त्याचा राग काढण्यासाठी रात्रीचा हल्ला झाला असल्याचेही दुसऱ्या बाजूकडून सांगण्यात येत आहे. रात्री ८ च्या सुमारास शहरातील भांडेवाडी रोडवर ही घटना घडली. हैदरवाडा भागात राहणाऱ्या तरुणांनी लाकडी दांडग्याने पवार याला मारहाण केली. त्यात तो जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, युवकाचा जबाब नोंदवल्यानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे. संघटनांचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात ठाण मांडून आहेत. पोलीस संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत. दरम्यान, कर्जत बंदची हाक देण्यात आली असल्याने शहरातील काही दुकाने बंद असून काही व्यवहार मात्र सुरळीत सुरू आहेत.
दरम्यान, पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेतली असून सकाळीच फिर्याद नोंदवून घेत तपास सुरू करण्यात आला आहे. हल्लेखोर आणि ज्यांच्यावर हल्ला झाला, त्यांच्यात जुनी भांडणे आहेत. दोघांची जुनी पार्श्वभूमीही तपासून पाहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस योग्य ती कारवाई करतील. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. नागरिकांनी संयम ठेवावा. ऐकीव माहितीवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन पोलीस निरीक्षक यादव यांनी केलं आहे. वरिष्ठ अधिकारीही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
टिप्पणी पोस्ट करा