तरुणांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा अनोखा उपक्रम

 


               खेळामुळे माणसाचे शारीरिक आरोग्यच नव्हे तर मानसिक आरोग्यसुद्धा सुधारते. खेळामुळे विधी संघर्षित बालक गुन्हेगारी वृत्तीपासून दूर जाऊन उत्तम खेळाडू होऊ शकतात.

               हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय राबवित असलेल्या निगडीमधील सेक्टर 22 ओटा स्कीम आणि यमुना नगरमधील खेळ उपक्रमाने सिद्ध केले आहे. बहुधा हा उपक्रम राज्यातील पहिलाच उपक्रम आहे; ज्यामध्ये पोलिसांनी खेळाच्या सहाय्याने विधी संघर्षित बालकांना बाल गुन्हेगारीपासून परावृत्त केले आहे.

            पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप आयुक्त सागर कवडे व टीम हा उपक्रम राबवत आहे. या उपक्रमाबद्दल माहिती देताना, कवडे म्हणाले की, 'या उपक्रमांतर्गत दिशा भरकटलेल्या 12 ते 18 वयोगटातील मुलांना फुटबॉलचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. यामध्ये विधी संघर्षित बालक व गुन्हेगारी प्रवृत्तीचे बालक यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. सुरुवातीला 2021 मध्ये 20 मुलांना प्रशिक्षण दिले जात होते. आता ती संख्या वाढून 120 एवढी झाली आहे. यातील 15 ते 20 उत्कृष्ट फुटबॉल खेळाडूंची टीम तयार करण्यात आली आहे. नुकत्याच नागपूर येथे झालेल्या स्लम सॉकर यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेमध्ये या मुलांच्या टीमने उत्कृष्ट कामगिरी केली व त्यांना सर्वोत्कृष्ट टीम म्हणून गौरवण्यात आले होते.'

                ते पुढे म्हणाले की, 'पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने या उत्कृष्ट फुटबॉलपटूंना एस्पायर इंडिया या नामवंत प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात येतील. त्यांच्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन देखील करण्यात येईल.

           या  उपक्रमामुळे झालेल्या चांगल्या परिणामांबद्दल माहिती देताना, कवडे म्हणाले, कि 'दिशा भरकटलेली बरीच मुले आता खेळात खेळत व्यस्त असल्यामुळे निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये मुलांचा सहभाग दिवसेंदिवस कमी होत आहे. या उपक्रमाच्या यशामुळे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालामार्फत पिंपरी चिंचवड शहरातील इतर भागातील इतर झोपडपट्टीमध्ये देखील हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.'

           पोलीस अंमलदार कपिलेश इगवे म्हणाले, की 'पोलीस आयुक्तालयाच्या पत्राव्यवहारामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने या उपक्रमातील मुलांना सराव करण्यासाठी दोन मैदाने दिली आहेत. यामध्ये प्रत्येकी एक मैदान निगडी आणि सांगवीमध्ये आहे.' पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने संदेश बोर्डे यांची या विधी संघर्षित व दिशा भरकटलेल्या बालकांना फुटबॉल खेळण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी नियुक्त केले आहे. बोर्डे हे त्यांच्या संदेश बोर्डे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून फुटबॉल प्रशिक्षण देत आहेत.

          'गुन्हेगारी क्षेत्रातील मुले हे चांगले नागरिक या प्रशिक्षणामुळे बनतील. तसेच भविष्यात हीच मुले क्रीडा शिक्षक व क्रीडा प्रशिक्षक म्हणून तयार होऊन उत्तम खेळाडू तयार करतील', असे बोर्डे म्हणाले. विमल फाउंडेशन व आरोग्य मित्र फाउंडेशन यांच्यामार्फत विधी संघर्षित बालक व गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या बालकांचे समुपदेशन करण्यात येत आहे. आरोग्य मित्र फाउंडेशनचे अध्यक्ष राजीव भावसार म्हणाले, की या दोन्ही फाउंडेशनमार्फत या मुलांच्या व्यसनमुक्तीसाठी पण काम केले जात आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने