दहीहंडीसाठी मुख्यमंत्र्याचा बोटीतून प्रवास

 


ब्युरो टीम: काल राज्यात सगळीकडे दहिहांडी उत्साहात साजरी करण्यात आली. मुंबईतील अनेक परिसरात दहिहांडीचा खास जल्लोष पाहायला मिळाला. डोंबिवलीतही सम्राट चौकामध्ये फाउंडेशन तर्फे दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला होता या उत्सवाला रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती होती. विशेष म्हणजे, दहीहांडी उत्सावाला हजेरी लावण्यासाठी रात्री साडे अकरा वाजता एकनाथ शिंदे यांनी मानकोली वेलेगाव ते डोंबिवली मोठा गाव गणेश घाटापर्यंत बोटीनं प्रवास करत कार्यक्रम स्थळ गाठलं

      रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास भर पावसात मुख्यंमत्री एकनाथ शिंदे डोंबिवलीत आले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे डोंबिवलीत दीपेश म्हात्रे फाउंडेशनच्या दहीहंडी उत्सवासाठी आले होते. खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील मानकोली वेलेगाव ते डोंबिवली मोठा गाव गणेश घाट येथे बोटीनं प्रवास केला. दरम्या, बोटिनं केलेल्या प्रवासाबाबत बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी बोट चांगली होती. सुरक्षितपणे आलोय, या ठिकाणी पोहोचलोय, अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली. खरं म्हणजे कार्यकर्त्यांचा आग्रह होता. आग्रहापुढे शेवटी नेत्याला देखील यावंच लागतं, असही ते म्हणाले.    

         डोंबिवली पश्चिमेकडे सम्राट चौकामध्ये दीपेश म्हात्रे फाउंडेशन तर्फे दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास मुख्यमंत्री येणार असल्याने डोंबिवली शहरात सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात होता. मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच डोंबिवलीत आलं होतं. त्यामुळे कार्यक्रमस्थळी एकनाथ शिंदे यांचा जोरदार स्वागत देखील करण्यात आलं. मुख्यमंत्री शिंदे यांचे माजी महापौर पुंडलिक म्हात्रे आणि माजी नगरसेवक तथा महोत्सवाचे आयोजक दिपेश म्हात्रे यांनी पुष्पगुच्छ आणि शाल, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्र्यांचे आगमन होताच गोविंदा पथकांनी एकच जल्लोष केला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी दोन वर्षानंतर दहीहंडी उत्सव होतोय सरकारने देखील पूर्णपणे मोकळीक दिली, अत्यंत उत्साहात सन साजरा होतोय याचं मला समाधान वाटतंय, आनंद होतोय, मी ज्या ठिकाणी गेलो त्या त्या ठिकाणी प्रचंड उत्साह दिसून येतोय अस सांगितलं. पुढे बोलताना हे सरकार तुमचं आमचं सगळ्यांचं सरकार आहे. हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे, हे शिवसेना भाजपा युतीचं सरकार आहे. प्रत्येकाला वाटतं हे माझं सरकार आहे. आपलं सरकार आहे, सर्वसामान्यांचं सरकार आहे, हा फरक या गोविंदा उत्सवांमध्ये पाहायला मिळतोय अनुभवला मिळतो ही चांगली बाब असल्याचे सांगितलं.

   रात्री साडे अकरा वाजता मुख्यमंत्री शिंदे डोंबिवली पश्चिमेतील रेतीबंदर खाडी किनारी उतरले. वेल्हे गाव ते रेतीबंदर अवघ्या १५ मिनिटाचा प्रवास आहे. माणकोली, वेल्हे परिसरातील नागरिक, विक्रेते दररोज सकाळी या बोटीने येऊन रात्री याच बोटीने घरच्या प्रवासाला निघतात.

…अन् रात्री साडेबारा वाजता मुंबईला रवाना देखील झाले –

      रेतीबंदर येथे उतरल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी माजी नगरसेवक व स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांचे अतिसुरक्षेचे वाहन खाडी किनारी सज्ज होते. या वाहनातून मुख्यमंत्री शिंदे डोंबिवली मोठागाव, रेतीबंदर रस्त्याने रेल्वे फाटक ओलांडून पंडित दिनदयाळ रस्त्यावरील दीपेश म्हात्रे फाऊंडेशनतर्फे आयोजित दहीहंडी उत्सवात सहभागी झाले. मुख्यमंत्री शिंदे यांचे कार्यक्रम स्थळी आगमन होताच गोविंदा पथकांनी जल्लोष केला. गोविंदा पथकांना शुभेच्छा आणि फाऊंडेशनच्या सदस्यांचे कौतुक करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा बोटीनेच वेल्हे गाव आणि तेथून आपल्या वाहनातून मुंबई येथे रात्री साडे बारा वाजता रवाना झाले. रात्रीच्या वेळेत बोटीतून येऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या धाडसाचा संदेश यानिमित्ताने दिला असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती.

प्रत्येकजण हा मुख्यमंत्री आहे –

    “राज्यातील सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. येथे कोणीही लहान मोठा नाही. त्यामुळे याठिकाणी उपस्थित असलेला प्रत्येक जण हा मुख्यमंत्री आहे, असे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील नागरी समस्या मार्गी लावण्यासाठी लवकरच मी स्वत: आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येथे येणार आहोत. येथील समस्यांची माहिती घेऊन त्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.” असे आश्वासन दिले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने