अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची निवडणूक गाजणार; तब्बल वीस उमेदवार रिंगणात


ब्युरो टीम: अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) निवडणुकीची उमेदवारांची अर्ज पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दिलेल्या मुदतीत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सर्वच्या सर्व तब्बल 20 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

         ही निवडणूक चांगलीच गाजण्याची चिन्हे दिसत आहेत. जागतिक फुटबॉल महासंघाने (फिफा) भारतीय फुटबॉल महासंघावर लावलेली बंदी मागे घेतल्यानंतर होत असलेल्या या निवडणुकीवर फिफाचे लक्ष राहणार आहे.

       अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच खजिनदार या महत्त्वाच्या तीनही जागांसाठी प्रत्येकी दोन अर्ज दाखल झाले असून कार्यकारी समिती सदस्यांच्या 14 जागांसाठी नेमके 14 अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, वरील तीन पदांसाठीची निवडणूक एकतर्फी होण्याची शक्‍यता जास्त असल्याचे सांगितेल जात आहे. या पदांबरोबरच महासंघाच्या कार्यकारिणीमधील सहा माजी खेळाडूंची (चार पुरुष आणि दोन महिला) स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात येणार आहे. त्यांना मतदानाचा अधिकार असेल.

        अध्यक्षपदासाठी भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायचुंग भुतिया व माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू कल्याण चौबे हे रिंगणात आहेत. उपाध्यक्षपदासाठी मानवेंद्र सिंग आणि कर्नाटकाचे एन. ए. हॅरिस यांच्यात चुरस अपेक्षित आहे. खजिनदारपदासाठी गोपाळकृष्ण कोसाराजू यांनी अरुणाचल प्रदेशाचे किपा अजय यांच्याविरोधात अर्ज दाखल केला होता मात्र, काही वेळातच त्यांनी माघार घेतल्याचेही जाहीर केले आहे. त्यामुळे किपा अजय यांची निवड झाल्याचेच मानले जात आहे.

      या निवडणुकीत कल्याण चौबे (अध्यक्ष), हॅरिस (उपाध्यक्ष) आणि किपा अजय (खजिनदार) यांचा विजय निश्‍चित मानला जात आहे. त्यांना महासंघाशी संलग्न असलेल्या तब्बल 18 राज्य संघटनांचा पाठिंबा असल्याचे सांगितले जात आहे.निवडणुकीत राज्य संघटनांमधून 34 प्रतिनिधी मतदान करणार आहेत.

खेळाडूंच्या मतदानाबाबत फिफाचाच निर्णय अंतिम

     या निवडणुकीत (All India Football Federation election) माजी खेळाडूंना मतदान करण्याचा हक्क राहणार का व ते नियमांत बसते का याची सध्या फिफाकडून पडताळणी सुरू आहे. जर हे नियमबाह्य ठरले तर पुन्हा एकदा भारतीय फुटबॉल महासंघावर कारवाईचा बडगा उगारण्यात येइ शकतो. मात्र, निवडणुकीत फिफाच्या नियमांनुसार सर्व कारवाई पूर्ण केली गेली तरच त्याना मान्यता दिली जाइल, असेही फिफाने स्पष्ट केले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने