ब्युरो टीम: देशात काँग्रेस पक्षच तुटत चालल्याने त्याचे गडही तुटू लागलेत. आगामी निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा सातारा लोकसभा मतदारसंघातील प्रभाव कमी होऊन भाजपची ताकद आणखी वाढलेली दिसेल, असा विश्वास केंद्रीय उद्योग व वाणिज्य राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला. या वेळी त्यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने काही मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघाचा समावेश असून, आढावा घेण्यासाठी माझा दौरा आहे. भाजपला २०२४ मध्ये केंद्रात पुन्हा सत्ता आणण्यासाठी आमची रणनीती ठरली आहे. त्यासाठी लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, उद्योजक, व्यावसायिक यांच्याशी आम्ही चर्चा करून केंद्राच्या योजना, कर्ज योजनांचा लाभ मिळतोय का याचा आढावा घेत आहोत, अशी माहिती प्रकाश यांनी दिली.
सोम प्रकाश पुढं म्हणाले, ‘‘भाजपच्या कार्यकर्त्यांनी लोकांच्या मनातील काम केले पाहिजे, तसेच कामांच्या माध्यमातून त्यांच्या मनात स्थान निर्माण केले पाहिजे. त्यातून मते मिळणार आहेत. नरेंद्र मोदी हे देशातच नव्हे, तर जगातील प्रभावशाली नेते बनले आहेत.’’ काँग्रेस पक्षच तुटत चालला असून, गडाचे काय घेऊन बसलात. महाराष्ट्रात, तसेच सातारा जिल्ह्यात शरद पवार यांचा प्रभाव आहे. त्यामुळे तुम्ही कोणती रणनीती अजमावणार यावर सोम प्रकाश म्हणाले, ‘‘आगामी निवडणुकीपर्यंत शरद पवार यांचा प्रभाव कमी होईल, तसेच भाजपची ताकद वाढत जाईल. त्याचा आम्हाला निवडणुकीत फायदा होईल.’’
कोट-
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने काही मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यात सातारा लोकसभेचा समावेश असून, या लोकसभेचा उमेदवार ज्या- त्या वेळी ठरविला जाईल.
- सोम प्रकाश, केंद्रीय उद्योग व वाणिज्य राज्यमंत्री
टिप्पणी पोस्ट करा