राज ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट



ब्युरो टीम: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी त्यांचं शासकीय निवासस्थान सागर बंगल्यावर पोहोचले होते. एबीपी माझ्याच्या वृत्तानुसार, जवळपास तासभर दोघांमध्ये चर्चा सुरु होती. या भेटीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण या भेटीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं असून, अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची शक्यता बोलली जात आहे.

            शस्त्रक्रियेनंतर विश्रांती घेणारे राज ठाकरे पुन्हा एकदा सक्रीय झाले असून नुकतंच ते पुण्यात सभासद नोंदणीसाठी पोहोचले होते. यानंतर राज ठाकरे सोमवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी त्यांच्या शासकीय निवास्थानी पोहोचले होते. या भेटीबाबत दोन्ही नेत्यांनी गुप्तता ठेवली होती. यामुळे या बैठकीबाबत चर्चा सुरु आहे.याआधी जुलै महिन्यात राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाली होती. देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांचं निवासस्थान ‘शिवतीर्थ’वर पोहोचले होते. राज ठाकरेंवर त्यावेळी नुकतीच शस्त्रक्रिया झाली होती.

राज ठाकरेंनी लिहिलं होतं पत्र

               देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर राज ठाकरेंनी फडणवीसांचं कौतुक करणारं पत्र त्यांना पाठवलं होतं. या पत्रामध्ये “पक्ष, पक्षाचा आदेश हा कुठल्याही व्यक्तीच्या आकांक्षेपेक्षा मोठा आहे हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिलं. पक्षाशी बांधीलकी म्हणजे काय असतं त्याचा हा वस्तुपाठच आहे. ही गोष्ट देशातल्या आणि राज्यातल्या सर्व राजकीय पक्षातील आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कायमस्वरुपी लक्षात टेवण्यासाठी आहे. खरोखरच अभिनंदन”, अशा शब्दांत फडणवीसांचं अभिनंदन केलं होतं. राज ठाकरेंच्या या पत्रानंतर पुन्हा एकदा मनसे-भाजपा एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली होती.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने