उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा अन् जाहीर सभाही


 मुंबई : शिवसेनेत फुटीनंतर आता उद्धव ठाकरेंसमोर पक्ष संघटन मजबूत करणं हे मोठं आव्हान आहे. यासाठी आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यानंतर आता उद्धव ठाकरे देखील लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. या काळात ते शिवसेना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्याचबरोबर लवकरच जाहीर सभाही आपण घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मातोश्री निवासस्थानी भेटायला आलेल्या शिवसैनिकांशी ते बोलत होते. (

      उद्धव ठाकरे म्हणाले, "सर्वांना हात जोडून मी एकच विनंती करतो की, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्वसामान्य माणसाच्या मनात एक चीड आहे. कारण ज्या पद्धतीनं फूट पाडणारे आमदार आपल्याशी वागलेत आणि वागत आहेत ही पद्धत हिंदुत्वाला साजेशी नाही. यांनी काय सोडलं हे नाही विचारायचं. महत्वाचा मुद्दा काय की त्यांना वाटलं होतं सत्ता म्हणजे सर्वकाही. एकदा सत्ता आली की लोक जातात कुठे? पण आता लोक त्यांना मतदारसंघात विचारायला लागलेत की तुम्ही हे का केलंय? आता आदित्य महाराष्ट्रात फिरतोय, साधारण तुम्ही इकडे येत आहात मी तुम्हाला भेटतोय. पण लवकरच मी देखील आता महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. आज जो दौरा जाहीर झालाय तो आपल्या सुषमाताई अंधारे आणि उपनेत्या दौरा आहे. त्यानंतर एक गटप्रमुखांचा मेळावा, नंतर दसरा मेळावाही असेल"   

पैसा संपेल पण निष्ठेचा झरा कुठेही आटू शकत नाही. हा झरा केवळ आणि केवळ शिवसेनेतच आहे. बाकी मला जे जाहीर सभेत बोलायच ते मी बोलेन. पण तुम्ही जसे आहात तसेच राहा आनंदी आणि हसत खेळत राहा. असे प्रसंग काही आपल्याला नवे नाहीत. पण तुम्ही सर्वजण साक्षीदार आहात ज्यावेळी शिवसेनेवर अशी संकट आली त्या त्यावेळी शिवसेना ही पहिल्यापेक्षा शतपटीनं अधिक ताकदवान झाली. जेवढं संकट मोठं तेवढी शिवसेना जास्त ताकदीनं मोठी होते, असं ठाकरे यावेळी म्हणाले.

प्रत्येकवेळी मी येणाऱ्या संकटाला संधी मानत आलो आहे, तशी आता आपल्याला संधी आहे. शहापूरचे जिल्हा परिषद सदस्य मला भेटायला आले होते. आता त्यांच्या मार्गातला अडथळा निघून गेला. तसेच तुमच्या मार्गातील अडथळाही निघून गेला. तुमच्यामध्ये आणि मातोश्रीमध्ये ज्यांनी भिंत बांधली होती ती भिंत आता पडून गेली आहे. आता बांध मोकळा झाला आहे. निष्ठावंतांना डावलून जे चेले चपाटे पुढे आले होते ते चेले चपाटे आता गेले. ज्यांच्या श्रमावर ते मोठे झाले त्या शिवसैनिकांचा मार्ग मोकळा झाला आहे. तर हा थोडासा काळ आहे जो निघून जाईल. आपण संघर्ष करु, ज्यांना मोठं केलं ती माणसं गेली. पण त्यांना मोठी करणारी साधी माणसं माझ्या सोबत आहेत. तीच माझी ताकद आहे. ही ताकद माझ्यासोबत आहे म्हणून मला संकटाची पर्वा नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याचं काम केलं.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने