काश्मिरी पंडितांवरील गोळीबार प्रकरणी अभिनेते अनुपम खेर यांची संतप्त प्रतिक्रिया

 

ब्युरो टीम: जम्मू आणि काश्मीरमध्ये आपल्याला कायमच तणावाचं वातावरण बघायला मिळतं. ‘कश्मीर फाइल्स’सारख्या चित्रपटातून ते दाहक वास्तव आपल्यासमोर मांडलं गेलं. गेल्या काही वर्षात काश्मीरमध्ये बरेच राजकीय बदल घडले. ३७० कलम हटवण्यात आलं ज्यामुळे भारत सरकारचं कौतुकही झालं आणि निंदादेखील करण्यात आली. एकूणच काश्मीरमधलं चित्र बदलताना जरी दिसत असलं तरी अजूनही तिथे तणावाचं वातावरण कायम आहेच. आता पुन्हा एकदा काश्मीरची शांतता भंग करत दहशतवाद्यांनी निरपराध लोकांवर हल्ला केला आहे.

     जम्मू काश्मीरमध्ये सफरचंदाच्या बागेत काम करणाऱ्या सुनील कुमार आणि पिंटू कुमार या दोन भावांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याचं वृत्त समोर आलं. या भ्याड हल्ल्यात सुनील कुमार यांनी त्यांचा जीव गमावला असून पिंटू कुमार जखमी झाले आहेत. ही बातमी समजल्यावर लगेच याविषयी सोशल मीडियावर लोकांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. नुकतंच सुप्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देत या सगळ्या प्रकाराबद्दल चीड व्यक्त केली आहे.

     अनुपम खेर म्हणतात , “काश्मिरी पंडितांवर अजूनही असे भ्याड हल्ले होत आहेत हे खूप लज्जास्पद आहे. हे दहशतवादी स्वतःच्या लोकांनाही ठार मारतात आणि भारताची बाजू घेणाऱ्या लोकांनाही ठार मारतात. गेली ३० वर्षे काश्मीरमध्ये हेच सुरू आहे. या प्रकरणाची जेवढी निंदा करावी तेवढी कमीच आहे. आपण ही मानसिकता बदलायला हवी.” अशा शब्दांत अनुपम यांनी या सगळ्या प्रकाराचा निषेध केला आहे.

      अजूनतरी कोणी इतर सेलिब्रिटीने याबद्दल भाष्य केलेलं नाही. अनुपम खेर हे भारतीय सिनेसृष्टीतलया दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहेत. चरित्र भूमिकांमधून त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. यावर्षी रिलीज झालेल्या ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटात अनुपम खेर महत्वाच्या भूमिकेत होते. १९९० साली घडलेल्या काश्मिरी पंडितांच्या नरसंहारावर हा सिनेमा बेतला होता. काश्मीरचं भयाण वास्तव या चित्रपटातून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी लोकांपुढे मांडलं. यात अनुपम खेर यांच्या भूमिकेचं आणि त्यांच्या कामाचंदेखील प्रेक्षकांनी खूप कौतुक केलं आहे.

      


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने