विद्यापीठ हे त्या भागातील शोषित पीडीत लोकांच्या विकासाचे केंद्र बनले पाहिजे . मागास भागातील संसाधनावर आधारित अभ्यासक्रम तयार करून रोजगार निर्मितीचे प्रयत्न विद्यापीठांनी केले पाहिजेत. असे आवाहन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी आज नागपूर मध्ये केले. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच प्रादेशिक केंद्र तसेच गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली , राज्य शासनाचा आदिवासी विकास विभाग आणि लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था याच्या एकीकृत प्रयत्नातून आदिवासींच्या आरोग्यविषयक उत्थानासाठी ‘ब्लॉसम’ या उपक्रमाचे उद्घाटन आज गडकरींच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते . याप्रसंगी महाराष्टृ आरोग्य विज्ञान विद्यापीठ-एमयूएचएसच्या कुलगुरु लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) प्रामुख्याने उपस्थित होत्या. गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांत बोकारे, अतिरिक्त आदिवासी आयुक्त रवींद्र ठाकरे, लक्ष्मणराव मानकर ट्रस्टचे अध्यक्ष अरुण लखाणी, ट्रस्टचे विश्वस्त सुधीर दिवे तसेच एमयूएचएसचे प्रादेशिक समन्वयक डॉ. संजीव चौधरी यावेळी उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या नीती आयोगाने ज्या जिल्ह्यामध्ये विकास कमी झालेला आहे अशा आकांक्षी जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध केले आहेत यामध्ये बहुतांश जिल्हे आदिवासीबहुल आहेत. आदिवासी जिल्ह्यांमध्ये खनिज उत्खनन , प्रकल्प बांधकाम या कामांना कायद्याचा अडसर निर्माण होतो . या भागात असणाऱ्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून असणारे उद्योग निर्माण झाले तर या भागात रोजगार निर्मिती होऊन इथली गरिबी दूर होईल. जाचक कायद्यांचा अडसर दूर करून आपण स्वत: रस्ते विकास करून मेळघाट सारख्या दुर्गम भागात 450 गावे जोडली . गडचिरोली जिल्ह्यात पूल आणि महामार्ग बांधले याचा विशेष उल्लेख गडकरी यांनी केला.
तसेच ब्लॉसम प्रकल्पाच्या माध्यमातून पुर्व विदर्भाच्या आदिवासी बहुल भागात एमयूएचएस, आदिवासी प्रकल्प आधिकारी तसेच गोंडवाना विद्यापीठ यासह इतर संस्थाचे प्रतिनिधी जाऊन वैद्यकीय परिक्षण , माहिती संकलन , उपाययोजना आणि सेवा करणार आहेत.येणा-या काळात ब्लॉसम सारख्या प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्व विदर्भातील सिकलसेल, थॅलसेमिया ग्रस्त रुग्णांच्या उपचारावर व इतर आजारांवरही अध्ययन होईल त्यामुळे स्वास्थ्य विषयक मार्गदर्शन मिळणार आहे. ब्लॉसम हा एक एकिकृत प्रकल्प असून यामध्ये शासकीय यंत्रणांच्या समन्वयातून प्रतिबंधात्मक उपचार त्याचप्रमाणे रुग्णसेवा होणार आहे. शिक्षण, स्वास्थ्य , अर्थव्यवस्था आणि सामाजिक सुधारणा या चार विषयांवर एकत्रित प्रयत्न केल्यास विकास साधता येतो असे मतही गडकरी यांनी यावेळी मांडले.
|
टिप्पणी पोस्ट करा