ब्युरो टीम: विनायक मेटे यांच्या निधनाची बातमी एका खाजगी वृत्तवाहिनीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रक्षेपीत होत असताना 'आरएसएस संघराज्य' या आकाउंटवरून 'पवारांचं निधन कधी होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष' अशी आक्षेपार्ह कमेंट करण्यात आली होती. इतकंच नाहीतरी याच आकाऊंवरून पुढे छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांच्या विषयी देखील आक्षेपार्ह लिखाण करण्यात आलं होतं. त्यानंतर या खातेधारकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सर्वच स्तरातून होत होती.
जितेंद्र आव्हाडांकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्वीट करत या खातेधारकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तर हे आकाउंट कोणाचे आहे, याचा तपास करावा अशी मागणी देखील केली होती. त्यात त्यांनी मुंबई पोलिसांना टॅग देखील केले होते. त्यानंतर पुण्यात आता यासंबंधी गुन्हा दाखल झाला आहे.
सायबर पोलिसांत गुन्हा दाखल
याबाबत पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. महेश संभाजी करपे (५०, रा. चंदननगर) यांनी या अकाउंट विरोधात फिर्याद दिली आहे. 'आरएसएस संघराज्य' या खातेधारकाने लाईव्ह चॅटमध्ये शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह लिखाण केले.
तसेच, छत्रपती शिवाजी महाराज, जिजामाता यांच्याबाबत अत्यंत बीभत्स मजकूर लिहून खोटा इतिहास प्रसारित करीत महापुरुषांची बदनामी केली.
इतकंच नाही तर आरएसएसबाबत जनमानसांत गैरसमज पसरवून दोन वर्गात द्वेष भावना पसरवल्याचंही फिर्यादीत म्हटले आहे. यानुसार, पोलिसांनी
'आरएसएस संघराज्य' या खातेधारकावर कलम १५३-अ, ४६५, ४६९, ५००, ५०५ (२) सह माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सायबर पोलीस करत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा