सुदानी नागरीका कडून तब्बल 5 कोटी रुपये किमतीची सोन्याची बिस्किटे जप्त , सहा नागरिक अटकेत.


मुंबई विमानतळावर  सीमाशुल्क (Mumbai Air Customs ) विभागाने 10 सप्टेंबर 2022 रोजी एका सुदानी प्रवाशांकडून तब्बल 5 कोटी 38 लाख रुपये किमतीची 12 किलो वजनाची सोन्याची बिस्किटे जप्त केली. हा प्रवाशी सुदानी प्रवाशांच्या एका गटाबरोबर दुबईहून एमिरेट्स फ्लाइट AK-500 ने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ?(CSMI Airport, Mumbai) आलेला होता.

सुरवातीला सुमारे 23 सुदानी प्रवाश्यांच्या एका गटाने एकत्र येऊन विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी गोंधळ घातला व  ग्रीन चॅनल मधून बाहेर पडण्याचा  प्रयत्न केला. त्यांनी अधिकाऱ्यांसमोर आरडाओरड करून आक्रमक पवित्रा घेतला आणि काही जण मारामारी देखील करू लागले परंतु सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी हि परिस्थिती कुशलतेने हाताळत पुरेशी कुमक घेऊन या आक्रमक प्रवाशांना आवरलं व परिस्थिती नियंत्रणात आणली. सीमाशुल्क आगमन क्षेत्रात गोंधळ निर्माण करून सोने घेऊन पलायन करायचा त्यांचा डाव होता.

गोंधळ सुरु असताना पळून जाण्याचा प्रयत्न करणार्‍या एका प्रवाशाने खास डिझाइन केलेल्या पट्ट्यात लपवून ठेवलेली प्रत्येकी एक किलो वजनाची 12 सोन्याची बिस्किटे सीमाशुल्क अधिकार्‍यांनी  प्रभावी आणि जलद कारवाई करत हस्तगत केली. याप्रकरणी सीमाशुल्क अधिकाऱ्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी गोंधळ घालणाऱ्या अन्य पाच प्रवाशांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.

चौकशीअंती या पाच प्रवाशांनी हे सोने विमानतळावर गोंधळ घालुन तस्करी करण्याचा पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याची कबुली दिली. सोने तस्करी करणाऱ्या व्यक्तींसह या सर्वांना 23.09.2022 पर्यंत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याशिवाय तपासणीत अडथळा निर्माण करणाऱ्या इतर सहा प्रवाशांना देखील पकडण्यात आले. मुंबई विमानतळ कार्यालयाच्या, ब्युरो ऑफ इमिग्रेशन, च्या  मदतीने या सहा प्रवाशांना काळ्या यादीत टाकून सुदानला परत पाठवण्यात आले आहे. 


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने