हॉंगकॉंगवर एकतर्फी मात करत टीम इंडिया थाटात 'सुपर फोर'मध्ये! सूर्या-विराट विजयाचे शिल्पकार

 


            आशिया चषक 2022 मधील चौथा सामना भारत विरुद्ध हॉंगकॉंग असा रंगला. काहीशा एकतर्फी झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने हॉंगकॉंगचा 40 धावांनी पराभव करत सुपर फोरमध्ये प्रवेश केला.

सूर्यकुमार यादव व विराट कोहली हे भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

          नाणेफेक गमावून फलंदाजीची संधी मिळालेल्या भारतीय संघाला कर्णधार रोहित शर्मा व केएल राहुल यांनी चांगली सुरुवात दिली. त्यांनी 4.5 षटकात 38 धावांची भागीदारी केली. रोहित 21 धावा करून माघारी परतला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या विराट कोहलीने काहीसे आक्रमक रूप धारण केले. मात्र, राहुल हा 39 चेंडूवर 36 धावा करून तंबूत परतला. विराट कोहली व चौथ्या क्रमांकावरील सूर्यकुमार यादव यांनी यानंतर अखेरच्या सहा षटकात वेगवान फलंदाजी केली. यादरम्यान विराटने आपले अर्धशतक पूर्ण केले. हे त्याच्या टी20 कारकिर्दीतील 31 वे अर्धशतक ठरले.

विराटच्या अर्धशतकानंतर सूर्यकुमार यादव यानेदेखील आपली खेळी आणखी पुढे नेली. त्याने अवघ्या 22 चेंडूत 50 धावांची गवसणी घातली. विराटने अखेरपर्यंत नाबाद राहत 44 चेंडूवर 1 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 58 धावा केल्या. तर दुसऱ्या बाजूने सूर्यकुमारने आणखी वादळी खेळी करत 26 चेंडूत 6 चौकार व 6 षटकार ठोकत नाबाद 68 धावा चोपल्या. भारताने निर्धारित 20 षटकात 2 बाद 192 अशी मोठी मजल मारली.

        प्रत्युत्तरात, हॉंगकॉंग संघ कोठेही स्पर्धेत दिसला नाही. दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाल्यानंतर बाबर हयात व किंचित शहा यांनी अनुक्रमे 41 व‌ 30 धावा केल्या. मात्र, भले मोठे आव्हान पार करताना त्यांना धावांचा अपेक्षित वेग राखता आला नाही. झिशान अली 26 व स्कॉटने 14 धावा करत संघाला 152 पर्यंत पोहचवले. अखेरीस, संघाला 40 धावांनी पराभव पत्करावा लागला.

---------------

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने