काय सुरु आहे राजस्थानच्या राजकारणात ? कोण होणार मुख्यमंत्री

 


मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केल्यानंतर राजस्थान मध्ये मुख्यमंत्र्यांची पदासाठी नावांची चर्चा सुरू झाली. सुरुवातीला गेहलोत काँग्रेस अध्यक्ष व मुख्यमंत्री या दोन्ही पदांवर कायम राहू शकतात अशी शक्यता होती, त्यांनी तशी इच्छाही देखील वरिष्टांकडे व्यक्त केली होती.दरम्यान, भारत जोडो यात्रे दरम्यान प्रवास करणाऱ्या राहुल गांधी यांनी एका पदावर एकच व्यक्ती असेल, असे संकेत दिले. तसेच उदयपूर येथील काँग्रेस अधिवेशनात घेतलेल्या निर्णयाची त्यांनी आठवण करून दिली. यात्रेदरम्यान सचिन पायलट यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली, आणि ते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार बनले. (rajasthan political crisis)

राहुल गांधींकडून संकेत मिळताच सचिन पायलट राजस्थानमध्ये सक्रिय झाले आणि त्यांनी आमदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या. राजस्थानच्या नवीन मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसने रविवारी संध्याकाळी ७ वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली होती. काँग्रेस हायकमांडने राष्ट्रीय सरचिटणीस अजय माकन आणि मल्लिकार्जुन खरगे यांना दिल्लीहून जयपूरला आमदारांशी चर्चा करण्यासाठी पाठवले होते. रविवारी दुपारी दोन्ही नेते जयपूरला पोहोचले होते. परंतु त्यानंतर राज्याच्या राजकारनाला अचानक वेगळे वळण लागले.

रविवारी दुपारपासून गेहलोत गटाचे आमदार सक्रिय झाले. सायंकाळी ५ वाजता या सर्व आमदारांना मंत्री शांती धारिवाल यांच्या निवासस्थानी बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. या बैठकीला गेहलोत गटाचे जवळपास सर्व आमदार पोहोचल्याचे कळते. दुसरीकडे विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी सायंकाळी ७ वाजेची वेळ निश्चित करण्यात आली होती, मात्र तिथे गेहलोत गटाचे आमदार पोहोचलेच नाहीत. याचदरम्यान धारिवाल हाऊसमधून बाहेर पडलेले गेहलोत गटाचे आमदार आपले राजीनामे घेऊन सभापती सीपी जोशी यांच्या घरी पोहोचले आणि  92 आमदारांच्या राजीनाम्याची घोषणा समोर आली.

काय आहे यामागील राजकारण 

अशोक गेहलोत यांच्या अध्यक्षपदाचा दावा करण्यापूर्वी शुक्रवारी राजस्थानमध्ये विधीमंडळ पक्षाची बैठक झाली होती. यावेळस गेहलोत समर्थक मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांनी स्पष्टपणे सांगितले होते की अशोक गेहलोत मुख्यमंत्री आणि काँग्रेस अध्यक्ष दोन्ही पदे सांभाळतील. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सर्व आमदारांनी हीच इच्छा व्यक्त केली होती.

अशोक गेहलोत यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे अध्यक्ष सीपी जोशी यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे केले होते. गेल्या अनेक वर्षांपासून गेहलोत आणि जोशी यांच्यातील जवळीक वाढली आहे. अशा परिस्थितीत आपला विश्वासू नेता राज्याचा मुख्यमंत्री व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. सीपी जोशी मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा ही काही पहिलीच वेळ नाही. 2008 मध्येही ते मुख्यमंत्री होऊ शकले असते, मात्र निवडणुकीत एका मताने पराभूत झाल्यामुळे ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. त्यानंतर गेहलोत यांना मुख्यमंत्री करण्यात आले.

2018 च्या विधानसभा निवडणुकीपासून अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात वाद सुरू आहे. त्यावेळस राजस्थानचे मुख्यमंत्री होण्यावरून दोघांमध्ये खडाजंगी झाली होती, परंतु शेवटी हायकमांडने गेहलोत यांना मुख्यमंत्री आणि पायलट यांना उपमुख्यमंत्री बनवले. सरकार स्थापन झाल्यानंतरही गेहलोत आणि पायलट यांच्यातील राजकीय संघर्ष चव्हाट्यावर आला. दोन्ही नेते एकमेकांच्या विरोधात अनेकदा दिसले. त्यामुळे दोघांमधील अंतर वाढत गेले. 

2020 मध्ये, सरकारच्या स्थापनेनंतर दोन वर्षांनी, पायलट यांनी बंड केले आणि आपल्या समर्थक आमदारांसह हरियाणातील मानेसर येथे गेले. अनेक दिवस चाललेल्या राजकीय उलथापालथीमध्ये गेहलोत यांना आपले सरकार वाचवण्यात यश आले, मात्र पायलट यांना प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री पदावरून हटवण्यात आले. तेव्हापासून पायलट हे फक्त आमदार आहेत. आता ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा आहे, मात्र गेहलोत त्यांच्या विरोधात उभे राहिलेले दिसत आहेत. 

गेहलोत यांच्यामुळेच पायलट यांना मुख्यमंत्री करण्यास आमदारांचा विरोध असल्याचे बोलले जात आहे. सचिन पायलटच्या विरोधात उभ्या असलेल्या आमदारांचे म्हणणे आहे की, 18 बंडखोर आमदार वगळता कोणालाही मुख्यमंत्री बनवा. ते त्यांना साथ देतील. अनेक आमदारांनी सभापती सीपी जोशी यांना मुख्यमंत्री करण्यास हरकत नसल्याचे बोलले जात आहे. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने