नौदलाचा नवा ध्वज शिवाजी महाराजांना समर्पित;महाकाय आएनएस विक्रांत नेव्हीत दाखल


 ब्युरो टीम:
महाकाय आएनएस विक्रांत  जहाज आज नेव्हीत दाखल झालं आहे. कोचीन येथील एका शानदार सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी आयएनएस विक्रांत युद्धनौकेचं जलावतरण केलं. यावेळी नौदलाच्या नव्या ध्वजाचं अनावरण करण्यात आलं. हा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित करण्यात आला. आज 2 सप्टेंबर 2022 च्या ऐतिहासिक तारखेला इतिहास बदलण्याचं एक काम झालं आहे. आज भारताने गुलामीचं एक निशाण, गुलामीचं एक ओझं आपल्या छातीवरून उतरवलं आहे. आज भारतीय नौसेनेला एक नवा ध्वज मिळाला आहे. आता पर्यंत नेव्हीचा ध्वज हा गुलामीची ओळख होता. परंतु आता छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेत, नवा ध्वज तयार करण्यात आला आहे. हा ध्वज सागर आणि आकाशात डौलाने फडकेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
          पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयएनएस विक्रांतचं जलावतरण करण्यात आलं. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतून प्रेरणा घेत तयार करण्यात आलेल्या ध्वजाचंही मोदींना लोकार्पण केलं. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि इतर मान्यवर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी सामर्थ्याच्या जोरावर शत्रूंची झोप उडवणारी आपली नौसेना उभारली. जेव्हा इंग्रज भारतात आले. तेव्हा भारतीयांनी तयार केलेले जहाज आणि त्याद्वारे होणारा व्यापार पाहून इंग्रजही बिथरले होते. त्यामुळेच त्यांनी भारताचं सागरी सामर्थ्य तोडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ब्रिटिशांनी कायदे करून भारतीय जहाज आणि व्यापाऱ्यांवर कठोर प्रतिबंध लादले होते, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं.
 महिलांसाठी कोणतेही निर्बंध नाही
            विक्रांत जेव्हा आमच्या सागरी सुरक्षेसाठी उतरेल, तेव्हा त्यावर अनेक महिला सैनिकही तैनात असतील. महिला शक्तीमुळे भारताची आणखी एक नवी ओळख निर्माण होईल. इंडियन नेव्हीने आपल्या सर्व शाखांमध्ये महिलांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. जे निर्बंध होते. ते हटवले जाणार आहेत. ज्या प्रकारे लाटांना काही मर्यादा नसतात, त्याचप्रमाणे भारताच्या कन्यांनाही काहीच बंधने नसतील. थेंबा थेंबाने विराट सागर तयार होतो. त्याचप्रकारे भारतीय नागरिकांनी व्होकल फॉर लोकलचा मंत्र उराशी घेऊन जीवनाचा प्रारंभ केल्यास देश आत्मनिर्भर होण्यास विलंब लागणार नाही, असंही ते म्हणाले.
विराट आणि विहंगम
        केरळच्या समुद्र तटावर आज महाकाय विक्रांतचं जलावतरण होत आहे. प्रत्येक भारतवासी या क्षणाचा साक्षीदार होत आहे. एका नव्या भविष्याच्या सूर्योदयाचा साक्षीदार होत आहे. विक्रांत विशाल आहे. विराट आहे. विहंगम आहे. विक्रांत विशिष्ट आहे. विक्रांत विशेष आहे. ही केवळ युद्धनौकाच नाही. तर 21व्या शतकातील भारताचे अथक परिश्रम, प्रतिभा, प्रभाव आणि कटिब्धतेचं प्रतिकही आहे, अशा शब्दात मोदींना विक्रांतचं कौतुक केलं.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने