भाजपाचं मुंबईप्रेम बेगडी, अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावर अंबादास दानवेंची टीका


 

ब्युरो टीम : मुंबईतील अनेक कार्यालये दिल्लीला हलवली असती तर समजू शकलो असतो, मात्र ती अहमदाबादला हलवण्यात आली. याचा अर्थ मराठी माणसांवरचे प्रेम आणि मुंबईचे महत्त्व कमी करून अहमदाबादला  ते देण्याचे काम सुरू आहे, अशी टीका विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते. विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी नाशिकच्या नुकसानग्रस्त वंजारवाडी गावात जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी दानवे यांनी थेट ग्राउंड झिरो गाठत शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या वावरातच अधिकाऱ्यांना धारेवर धरत तत्काळ मदत करण्याचे आदेश दिले. बुलेट ट्रेनच्या कामासाठी येण्यापेक्षा नेते मंडळींनी शेतकऱ्यांच्या वावरात यावे, असे म्हणत त्यांनी भाजपाला टोला लगावला आहे. तर अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावरही त्यांनी टीका केली आहे.

‘या सर्वांवर महाराष्ट्र मात करेल’

      अमित शाह गणपती बाप्पाच्या दर्शनाला आले आहेत. मात्र मुंबईवर बेगडी प्रेम दाखवायचे काम त्यांनी केले आहे. महाराष्ट्र सोशिक राहिला आहे. या सर्वांवर महाराष्ट्र मात करेल, असेही ते म्हणाले. आशिष शेलारांवर टीका करताना ते म्हणाले, की शिवसेना कोणती आणि कशी सेना आहे, हे निवडणुकीच्या मैदानातच स्पष्ट होईल. आशिष शेलारच काय सर्व विरोधकांना ते दाखवून देईल, असा टोला आशिष शेलारांना त्यांनी लगावला आहे. शिवसेनेला पेंग्विन सेना का म्हणू नये, असा टोला आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावला होता. त्याला दानवेंनी प्रत्युत्तर दिले.

‘राज्यपालांच्या निर्णय तत्परतेविषयी लवकरच भूमिका ठरवू’

महाविकास आघाडी सरकार असताना अनेक निर्णयांचा पाठपुरावा केला. मात्र राज्यपालांनी तत्परता दाखवली नाही. आता शिंदे-फडणवीसांच्या काळात प्रलंबित 12 आमदारांच्या यादीवर निर्णय लवकर होणार आहे. यावरून राज्यपालांची तत्परता दिसून येते, असा टोला दानवेंनी भगतसिंग कोश्यारी यांना लगावला आहे. म्हणजे ज्या निर्णयांसाठी दोन-दोन, तीन-तीन वर्ष वाट पाहावी लागत होती, ते निर्णय दोन-तीन मिनिटांत घेतले जात आहेत. त्यामुळे आगामी काळात याविषयी निश्चित भूमिका घेऊ, असे ते म्हणाले. सामना हे ज्वलंत विचाराचे वर्तमानपत्र आहे. त्याचे विचार देशपातळीपर्यंत पोहोचतात, असेही दानवे यावेळी म्हणाले.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने