भारतातील रस्ते आणि महामार्ग प्रकल्पात गुंतवणूकीसाठी, अमेरिकेतील गुंतवणूकदारांना आवाहन.



ब्युरो टीम: भारतातील रस्ते आणि महामार्ग प्रकल्प, गुंतवणूकदारांसाठी सोन्याच्या खाणीसारखे आहेत, असं सांगत अधिकाधिक उद्योजकांनी त्यात गुंतवणूक करावी, असे आवाहन, केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अमेरिकेतील गुंतवणूकदारांना केले आहे. भारत-अमेरिका चेंबर ऑफ कॉमर्सने आयोजित केलेल्या 19 व्या  भारत- अमेरिका आर्थिक परिषदेचे ऑनलाईन उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.   

केंद्र सरकार येत्या काही वर्षात राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाईपलाईन प्रकल्पाच्या माध्यमातून, 1.4 ट्रिलियन रुपयांची गुंतवणूक करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच आम्ही देशभरात, 10,000 किमीचे 27 ग्रीनफील्ड द्रुतगती मार्ग विकसित करणार आहोत, आणि त्यासाठी 5 लाख कोटी म्हणजे 60 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

प्रकल्प गुंतवणुकीत, किरकोळ गुंतवणूकदारांनाही सहभागी होता यावं यासाठी आम्ही, InvIT सारखे काही गुंतवणूक स्नेही, अभिनव  उपक्रम देखील राबवत आहोत. तसेच आम्ही आमच्या उत्पादनांची संरचना अशाप्रकारे करतो आहोत, जेणेकरुन, किरकोळ गुंतवणूकदारांना त्यातून चांगले परतावे मिळू शकतील, जे मुदतठेवीवरील व्याजदरांपेक्षा निश्चितच अधिक असतील, असेही गडकरी म्हणाले.

भारत, इलेक्ट्रिक वाहनांची सर्वात मोठी बाजारपेठ ठरला आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी, सौर आणि पवन उर्जेवर आधारित चार्जिंग यंत्रणा उभरण्यास सरकार प्रोत्साहन देत आहे. याचप्रमाणे इलेक्ट्रिक हायवे विकसित करण्याच्या संकल्पनेवर देखील आम्ही काम करत असून सौर ऊर्जेतून मिळणाऱ्या वीजेवर आधारित या महामार्गांवर ट्रक आणि बसेस सारख्या मोठ्या वाहनांचे  बॅटरी चार्जिंग देखील शक्य होईल, अशी आशा गडकरी यांनी व्यक्त केली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने