मराठमोळ्या दिग्दर्शकाच्या नवीन प्रवासाला सुरुवात; कार्तिक-कियाराची 'सत्यप्रेम की कथा


ब्युरो टीम:  अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणीही 'भुल भुलैया २' ची जोडी आणखी एका प्रेमकहाणीसाठी सज्ज झाली आहे. 'सत्यप्रेम की कथा' या त्यांच्या आगामी सिनेमाचं शूटिंग शनिवार ०३ सप्टेंबर २०२२ पासून सुरू झालं आहे. कार्तिकने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो गणपती बाप्पासमोर नतमस्तक झालेला पाहायला मिळतोय. या पोस्टमध्ये त्याने 'शुभारंभ, सत्यप्रेम की कथा' असं म्हटलं आहे. हा सिनेमा म्युझिकल रोमँटिक ड्रामा असणार आहे. कियारा-कार्तिकच्या या नव्याकोऱ्या सिनेमासाठी चाहते उत्सुक असल्याचं दिसतं आहे.

मराठमोळा दिग्दर्शक करतोय दिग्दर्शन

               राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा 'आनंदी गोपाळ'चा दिग्दर्शक समीर विद्वांस 'सत्यप्रेम की कथा'च्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळताना दिसणार आहे. आनंदी गोपाळ व्यतिरिक्त समीर 'डबल सीट', 'धुरळा', 'मला काहीच प्रॉब्लेम नाही', 'वाय झेड', 'टाइम प्लीज' या सिनेमांसाठी ओळखला जातो. मराठी मनोरंजन विश्वात दर्जेदार चित्रपट देणाऱ्या समीरचा हा पहिलाच बॉलिवूड सिनेमा असणार आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून समीरवर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

      मराठी मनोरंजन विश्वातील विविध कलाकारांनी समीरसाठी खास इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत त्यांच्या लाडक्या मित्राच्या नव्या प्रोजेक्टसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये ललित प्रभाकर, अनिश जोग, सई ताम्हणकर, हेमंत ढोमे, क्षिती जोग, इरा कर्णिक इ. या लोकप्रिय कलाकारांचा समावेश आहे. याशिवाय समीरने सोशल मीडियावर या सिनेमाबाबत एक खास पोस्ट केली आहे. ज्यात तो म्हणतो आहे की, 'सत्तू आणि कथा, आजपासून प्रेमकहाणीला सुरुवात'. समीरच्या या पोस्टवरही मराठी तसंच बॉलिवूड इंडस्ट्रीतील कलाकारांनी समीरला शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट केल्या आहेत.

शूटिंग सुरू होण्याआधी बदलले सिनेमाचे नाव

        साजिद नाडियाडवालाची निर्मिती असणारा हा सिनेमा काही महिन्यांपूर्वी नावामुळे वादातही सापडला होता. याआधी या सिनेमाचे नाव 'सत्यनारायण की कथा' असे होते. धार्मिक भावनांना ठेच पोहोचू नये म्हणून या सिनेमाचे नाव बदलण्यात आल्याची निवेदन समीर याने सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर आता हा सिनेमा 'सत्यप्रेम की कथा' या नावाने प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. २९ जून २०२३ रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

--------------


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने