बारामतीचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी दिल्लीतून नियोजन, नवीन वायनाड शोध सुरु करा : राम शिंदे


ब्युरो टीम: इंदापूर कामगिरीने आम्ही २०१९ ला यश मिळवले. राहुल गांधींनी वायनाड मतदारसंघ शोधला होता. आता सुप्रिया सुळे यांनीही त्यांचा 'वायनाड' शोधावा. कारण बारामतीचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी दिल्लीतून नियोजन सुरु आहे, यंदा काहीही झालं तरी बारामतीचा गड सर करणारच", असा विश्वास भाजप नेते आणि ज्यांच्याकडे बारामतीच्या प्रभारीपदाची जबाबदारी दिली आहे त्या राम शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

        भाजपचे वरिष्ठ नेते पुढच्या काही दिवसांत बारामती दौऱ्यावर येणार आहे. त्याच दौऱ्याच्या नियोजनासाठी इंदापूरच्या अर्बन बँकेच्या सभागृहात प्रभारी राम शिंदे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत भाजपच्या स्थानिक नेत्यांची बैठक पार पडली. यै बैठकीला किसन मोर्चा प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, पृथ्वीराज जाचक आदी नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर राम शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधून दौऱ्याची सखोल माहिती दिली.

       केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन तीन दिवसीय बारामती दौऱ्यावर असणार आहेत. २२ ते २४ सप्टेंबर दरम्यान त्या बारामती लोकसभा मतदारसंघाची पाहणी करतील, नवी व्यूव्हरचना आखतील. दुसरीकडे नवनिर्वाचित भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे  पुढच्या दोन दिवसांत म्हणजे ६ तारखेला बारामतीच्या दौऱ्यावर असतील. सीतारामन यांच्या दौऱ्याच्या तयारीचा बावनकुळे आढावा घेतील.

        "अमेठीमध्ये २०१४ साली आम्हाला पराभवाचा धक्का बसला. पण आम्ही थांबलो नाही. आमचे प्रयत्न आम्ही सुरुच ठेवले. आम्हाला २०१९ ला यश मिळालं. राहुल गांधी पराभूत होतील, असं कुणालाही वाटलं नाही पण भाजपने त्यांना पराभूत करुन दाखवलं. ए ऑफ अमेठी मिशन सक्सेस झालं, आता बी फॉर बारामतीचं मिशन आम्हाला साध्य करायचं आहे. आम्ही २०१४, २०१९ ला बारामतीत हरलो पण आता २०२४ ला कोणत्याही परिस्थितीत जिंकणारच..." असं राम शिंदे म्हणाले.

निर्मला सीतारामन यांचा बारामती दौरा

       २२ ते २४ सप्टेंबर रोजी निर्मला सीतारामन बारामती दौऱ्यावर

२३ सप्टेंबर रोजी त्या इंदापूरमध्ये मुक्कामी येणार

२४ सप्टेंबर रोजी इंदापुरातील प्रतिष्ठित नागरिक, डॉक्टर, वकील, व्यापारी, शिक्षकांची बैठक

दुसरी बैठक निमगाव केतकी आणि शेतकरी मेळावा

भिगवणमध्येही महिला मेळावा घेण्यात येणार

------------------


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने