भगत सिंह कोश्यारी यांनी आजपर्यंत केलेल्या कामाचा सन्मान म्हणजे त्यांच्यावरील हे पुस्तक: रामनाथ कोविंद

 


साधेपणा, विनयशीलता आणि राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आजपर्यंत केलेल्या कामाचा सन्मान म्हणजे त्यांच्यावरील ‘भगत सिंह कोश्यारी : ए सोल डेडीकेटेड टू द नेशन’ हे पुस्तक होय, असे गौरवोद्गार भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले. राजभवन, दरबार हॉल येथे डॉ. तुषार कांती बॅनर्जी लिखीत ‘भगत सिंह कोश्यारी : ए सोल डेडीकेटेड टू द नेशन’ या पुस्तकाचे प्रकाशन माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, रामनाथ कोविंद यांच्या पत्नी श्रीमती सविता कोविंद, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुस्तकाचे लेखक डॉ. तुषार कांती बॅनर्जी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी श्री.कोविंद म्हणाले, महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून संविधानिक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणारे श्री.कोश्यारी यांची सामान्य कार्यकर्ता ते राज्यपाल ही वाटचाल प्रत्येकासाठी दिशादर्शक ठरणारी आहे. संसद भवनाच्या दोन्ही सभागृहाचा कामाचा अनुभव असलेले श्री. कोश्यारी यांनी उत्तराखंडच्या मूलभूत सुविधांच्या निर्मितीमध्ये उल्लेखनीय योगदान दिलेले आहे. देशातील सैनिकासाठी ‘वन रँक वन पेन्शन’ लागू करण्यामध्ये श्री. कोश्यारी यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. अध्यात्मिक अधिष्ठान असलेले श्री. कोश्यारी यांच्या कामाचा आवाका, अहोरात्र काम करण्याची वृत्ती आणि निस्वार्थी भावना ही प्रत्येक व्यक्तीसाठी अनुकरणीय आहे.

राजभवन लोकाभिमुख करण्याच्या वृत्तीतून कार्यरत असलेले श्री. कोश्यारी यांनी कोरोना संकटाच्या काळात देखील अहोरात्र काम करून संकट समयी एक आश्वासक नेतृत्व म्हणून दिलासा दिलेला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांना भेटी देत दुर्गम भाग, सीमा क्षेत्र, आदिवासी भाग या ठिकाणी भेटी देऊन जनसामान्यांचे प्रश्न समजून घेतले. त्यामुळेच आजच्या कार्यक्रमात उपस्थितांमध्ये विविध क्षेत्रातील जनतेचे प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे, ही निश्चितच समाधानाची बाब असल्याचे श्री. कोविंद म्हणाले. बहुआयामी जीवन जगत असलेले श्री. कोश्यारी यांनी राष्ट्रीय एकात्मता तसेच भारताच्या सुरक्षेसाठी कायमच आवाज उठवला आहे अशा व्यक्तित्वाची ओळख करून देणारे हे पुस्तक निश्चितच वाचकांसाठी दिशादर्शक व प्रेरणादायी ठरेल, अशी अपेक्षाही श्री. कोविंद यांनी व्यक्त केली. यावेळी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनीही मनोगत व्यक्त केले 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने