भारत- पाकिस्थानची वर्चस्वासाठी लढाई ; आज होणार दुसऱ्यांदा लढत


ब्युरो टीम: आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेची खरी स्पर्धा आजच्या सामन्यातून सुरू झालेली असली तरी सुपर-४ (अव्वल चार संघ) मधील सर्वात महत्त्वाची लढत अर्थात भारत-पाकिस्तान सामना आज होत आहे. गेल्या रविवारी भारतीय संघाने पाकिस्तानला धूळ चारली. आता हेच वर्चस्व कायम ठेवण्यासाठी रोहित शर्माचा संघ सज्ज आहे. त्याच वेळी बाबर आझमचा संघ परतफेड करण्यासाठी प्रयत्नशील असेल, मात्र हा सामनाही प्रेक्षकांसाठी मेजवानी असेल, यात शंका नसेल.

        पहिला सामना अटीतटीचा झाला, ज्यात अगदी शेवटच्या काही चेंडूत हार्दिक पंड्याने डोके शांत ठेऊन भारताला विजयी केले. फरक इतकाच आहे, की हार्दिकला समर्थ साथ देणारा रवींद्र जडेजा गुढघ्याच्या दुखापतीने स्पर्धेबाहेर गेला आहे. जडेजा म्हणजे फलंदाजी, गोलंदाजी आणि अफलातून फिल्डिंगचे थ्री इन वन पॅकेज असल्याने भारतीय संघाला तो नसल्याची उणीव जाणवेल. डावखुरा फलंदाज संघात असावा, असा विचार झाला, तर रिषभ पंतला संघात जागा द्यावी लागेल. पाकिस्तानसमोर खेळताना ५ नव्हे, तर ६ गोलंदाज संघात असणे गरजेचे असल्याने कदाचित दिनेश कार्तिकवर संघातून बाहेर बसण्याची वेळ येऊ शकते.

         भारत आणि पाक दोन्ही संघांना अपेक्षित सुरुवात फलंदाजी करताना मिळालेली नाही. सुपर फोर फेरीत त्याच चौकीवर मार्ग शोधला जाणार आहे. बाबर आझम आणि रोहित शर्मा दोन्ही कप्तानांना बॅटने मर्दुमकी दोन सामन्यात गाजवता आलेली नाही. महत्त्वाच्या सामन्यात दोघेही मोठी खेळी करायला सर्वस्व पणाला लावतील, यात शंका नाही.

         पहिल्या सामन्यात ३५; तर दुसऱ्या सामन्यात नाबाद ५९ धावा काढल्या आहेत. थोडक्यात विराट कोहलीचा फॉर्म परत आल्याचे सुलक्षण दिसून आले आहे. ‘कोहली म्हणजे फटाक्याची माळ आहे जेव्हा ती पेटत नाही तेव्हा आवाज येत नाही; पण जेव्हा पेटते तेव्हा शेवटपर्यंत वाजत राहते. फॉर्ममध्ये आल्यावर विराट कशी फलंदाजी करू लागतो, याबद्दल भारतीय संघातील एका खेळाडूने प्रतिक्रिया देताना सांगितले.

        दुबईच्या मैदानावर नाणेफेक जिंकणारा कप्तान प्रथम गोलंदाजी करेल, असे वाटते; पण पहिली फलंदाजी करतानाही मोठा धावफलक उभारला जाऊ शकतो, असेही गेल्या काही सामन्यात दिसून आले आहे. नाणेफेक कोणीही जिंको; दडपणाखाली पाकिस्तानची गोलंदाजी थोडी गडबड करते, हे लक्षात घेऊन भारतीय फलंदाज दडपण निर्माण करायला आक्रमक खेळी करायच्या विचारात आहेत. सुट्टीचा दिवस असल्याने परत एकदा भारत आणि पाकिस्तानचे चाहते सामन्याचा आनंद प्रत्यक्ष मैदानावर घ्यायला गर्दी करणार आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने