अमित शाहांचे मिशन मुंबई सुरु, सह्याद्री अतिथिगृहातून थेट मराठीतून ट्वीट

ब्युरो टीम: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर आले आहेत. लालबागचा राजाच्या दर्शनाने शाहांचा दौरा सुरु होणार आहे. मात्र त्याआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शाहांनी चर्चा केली. सह्याद्री अतिथिगृहावर या तिघांची भेट झाली. विनोद तावडे, आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले अशी भाजपच्या बड्या नेत्यांची फौज या ठिकाणी पाहायला मिळत आहे. लालबागचा राजाच्या मंडपाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

        केंद्रीय गृहमंत्री लालबागचा राजाच्या दर्शनाला येत असल्यामुळे परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शाहांच्या सोबत जाणार नसल्याची माहिती आहे. शिंदेंच्या नियोजित कार्यक्रमात अचानक बदल करण्यात आल्याचं बोललं जात आहे. सुरक्षेच्या कारणास्तव मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

         दरम्यान, अमित शाहांसोबत होणाऱ्या भाजप प्रदेश कोअर कमिटीच्या बैठकीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. ही बैठक आता मुंबई विमानतळावर संध्याकाळी पाच वाजता नियोजित करण्यात आली आहे.

अमित शाहांचं मराठीत ट्वीट :

        गणेशोत्सवादरम्यान मुंबईत असणं हा एक विशेष अनुभव आहे. आज मुंबईत लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन त्यानंतर वांद्रे पश्चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सवात सहभागी होईन. शिक्षक दिनानिमित्त दुपारी पवईत नाइक चॅरिटेबल ट्रस्टच्या ए एम नाइक विद्यालयाचे उद्घाटन होईल, असे मराठीत ट्वीट अमित शाहांनी केलं आहे.

         अमित शाहांच्या स्वागतासाठी भाजपच नाही, तर शिंदे गटानेही कार्यकुशल गृहमंत्री अमित शाह यांचे शिवसेनेतर्फे मुंबईत स्वागत, असं लिहिलेले बॅनर शहरभर झळकवले आहेत. विशेष म्हणजे मातोश्रीच्या समोरही पोस्टरबाजी करुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना डिवचण्यात आले आहे.

     मुंबई महापालिकेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत. मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असल्याचे कळते. गेली २५ वर्ष मुंबई महापालिकेवर असलेली शिवसेनेची सत्ता उलथवण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. शाहांच्या मुंबई दौऱ्याच्या निमित्ताने ‘मिशन मुंबई महापालिका’चा शुभारंभ होणार असल्याचे समजते.

          दरम्यान, यंदा गणेशोत्सवावर कोणतेही निर्बंध नसल्याने ते लालबागचा राजा आणि सिद्धिविनायकाचे दर्शन घेतील. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या निवासस्थानीही गणपती बाप्पाचे दर्शन घेणार असल्याची माहिती आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने