अभिनेत्री कंगना रणौत तिच्या बेधडक वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत

ब्युरो टीम: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. बॉलिवूड आणि खासकरून घराणेशाही विरोधात आवाज उठवणाऱ्या कंगनाला कायमच सत्ताधारी पक्षाच्या हातातलं बाहुलं म्हणून ट्रोल केलं जातं. याबरोबरच कंगना तिच्या बेधडक स्वभावासाठी लोकप्रिय आहे. नुकताच तिचा धाकड चित्रपट प्रदर्शित झाला आणि चांगलाच आपटला. कंगना आता श्रीमती इंदिरा गांधी यांच्यावर एक चरित्रपट करत आहे. या चित्रपटात ती स्वतः मुख्य भूमिकेत असून ती स्वतःच या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे.

      कंगना ही तिच्या बेधडक स्वभावासाठी आणि राजकीय बाजू घेण्यासाठी ओळखली जाते. चित्रपटसृष्टीबरोबर कंगना या देशातल्या प्रत्येक मुद्दयावर भाष्य करताना आढळते. नुकतंच कंगनाने कर्तव्य पथाच्या उद्घाटन सोहोळयाला हजेरी लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कार्यक्रमात सुभाषचंद्र बोस यांच्या एका पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. याच कार्यक्रमात कंगनाने मीडियासमोर आपले राजकीय विचार मांडले. ८ सप्टेंबर रोजी कर्तव्यपथ आणि तिथल्या नेताजींच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले.

    कंगना म्हणाली, “मी नेताजींविषयी नेहमीच बोलते. मी तर कित्येकवेळा हे स्पष्ट केलं आहे. मी गांधीवादी नसून नेताजी सुभाषचंद्रवादी आहे.” कंगनाने यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलसुद्धा भाष्य केलं. ती म्हणाली, “आजच्या ऐतिहासिक दिवसाची मी साक्षीदार आहे आणि यासाठी मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते. मी नेहमी सांगते की आपल्याला स्वातंत्र्य हे सुभाषचंद्र बोस आणि वीर सावरकर यांच्यामुळे मिळालं. आपल्याला स्वातंत्र्य विणवण्या करून मिळालं नाही, आपण हक्काने ते मिळवलं आहे.”

      याच कार्यक्रमात बॉलिवूडचे आणखी काही कलाकार उपस्थित होते, सुप्रसिद्ध गायक मोहित चौहान यानेसुद्धा त्याचं मत व्यक्त केलं. तो म्हणाला, “ही खूप चांगलं कार्य आपल्या हातून घडत आहे. आपल्या देशासाठी झटलेल्या लोकांना आपण योग्य तो सन्मान द्यायलाच हवा.” कर्तव्यपथाच्या उद्घाटनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचं मनोगत व्यक्त केलं. पण सोशल मीडियावर चर्चा झाली ती कंगनाच्या वक्तव्याची. काहींनी कंगनाला ट्रोल केलं तर काहींनी कंगनाच्या या बेधडक स्वभावाचं कौतुक केलं. कंगनाचे ‘इमर्जन्सि’ आणि ‘तेजस’ हे दोन चित्रपट येत्या काळात चित्रपटगृहात झळकणार आहेत.

-----

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने