सुरेश रैनाची सर्वच प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा


ब्युरो टीम: सुरेश रैनाने क्रिकेटच्या सर्वच फॉर्मेटमधून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. त्याने मंगळवारी एका ट्विटद्वारे ही घोषणा केली. रैनाने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली होती. याच दिवशी भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यानेही संन्यास घेण्याची घोषणा केली होती.

      रैनाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारांतून काढता पाय घेण्याची घोषणा केली आहे. म्हणजे तो यापुढे देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा व आयपीएलमध्येही खेळताना दिसून येणार नाही. तो आपल्या ट्विटमध्ये म्हणाला -'देश व उत्तर प्रदेशासाठी खेळणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट होती.' त्याने या ट्विटमधून बीसीसीआय, उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन, आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचेही आभार मानलेत.

2022 IPL मध्ये कोणत्याही फ्रॅन्चायझीने खरेदी केले नव्हते

       आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर रैना आयपीएल व परदेशी लीगमध्ये खेळत होते. पण 2022 च्या आयपीएलमध्ये त्यांना चेन्नईसह कोणत्याही फ्रॅन्चायझीने घेतले नाही. त्यामुळे आयपीएलमध्ये परतण्याची त्यांची आशा मावळली होती. रैनाने आयपीएलचा 2021 हंगाम अर्ध्यावर सोडला होता. त्याच स्पर्धेत त्यांनी आयपीएलचा आपला शेवटचा सामना खेळला होता.

भारतासाठी तिन्ही फॉर्मेटमध्ये शतक ठोकणारा फलंदाज

      सुरेश रैनाने आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये 18 टेस्ट, 226 वनडे व 78 टी-20 सामने खेळले. कसोटीत त्याच्या नावाने एका शतकासह 768 धावा आहेत. तर 226 एकदिवसीय सामन्यांत त्याने 5 शतकांच्या मदतीने 5615 धावा केल्या. याऊलट 78 टी-20 सामन्यांत रैनाने भारतासाठी 1604 धावा वसूल केल्या. यात एका शतकाचाही समावेश आहे. रैनाचा तिन्ही प्रकारांत भारतासाठी शतक ठोकणाऱ्या काही निवडक फलंदाजांत समावेश आहे.

परदेशी लीगमध्ये खेळणार

   रैनाने देशांतर्गत क्रिकेटला अलविदा म्हटले असले तरी, तो रोड सेफ्टी सिरीज सारख्या आंतरराष्ट्रीय लीगमध्ये खेळताना दिसू शकतो. काही माध्यमांनी दावा केला आहे की, रैनाने यासंबंधी बीसीसीआयकडे NOC म्हणजे नाहरकत प्रमाणपत्र मागितले आहे.         

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने