भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा सामना खेळला गेला. ज्यामध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 6 विकेट्सने पराभूत करून मालिका 2-1 ने आपल्या खिशात घातली. या मालिकेतील शानदार गोलंदाजीबद्दल अक्षर पटेलला मालिकावीर तर सूर्यकुमार यादवला सामन्यातील ६८ धावांच्या शानदार खेळीसाठी 'सामनावीर' म्हणून गौरवण्यात आले. त्याचबरोबर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानेही ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकून इतिहास रचला आहे. भारतासाठी T20 सामन्यांमध्ये सर्वाधिक विजय नोंदवणारा तो दुसऱ्या नंबरचा कर्णधार बनला आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने तीन सामन्यांच्या T20 मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 2-1 ने पराभव केला. या विजयानंतर रोहित शर्माने भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले आहे. आता टीम इंडियाचे कर्णधार असताना T20 मध्ये सर्वाधिक विजयांची नोंद करणारा तो दुसरा कर्णधार बनला आहे. T20 मध्ये भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वात 33 सामने जिंकले आहेत तर कोहली 32 सामन्यातील विजयांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी, हा अजूनही यात पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने भारतीय क्रिकेट संघाला T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आपल्या नेतृत्वाखाली एकूण 42 वेळा विजय मिळवून दिला आहे. टीम इंडियाने आपली दमदार कामगिरी पुढील वर्षभर सुरू ठेवली, तर धोनीला मागे टाकून रोहित सर्वाधिक विजय मिळवणारा कर्णधारही बनू शकतो. 28 सप्टेंबर पासून टीम इंडिया रोहितच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन T20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा