मंत्री तानाजी सावंतांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे काय ? कॉंग्रेस नेते किरण काळे यांचा सवाल.

 

    ब्युरो टीम: जनतेच्या मनातील राज्यातील महाविकास आघाडी सरकार षडयंत्र रचून पाडले गेले. जनभावनेच्या विरोधात सत्ता स्थापन केली गेली. मात्र नव्या सरकारमधील मंत्र्यांना लोकशाही मान्य नाही असे दिसते आहे. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी हाफकिन संदर्भात साधा प्रश्न विचारल्यावर भडकलेल्या मंत्री ना.तानाजी सावंत यांनी प्रसार माध्यमांनी आपल्याशी बोलू नये, असे संतापजनक वक्तव्य केले आहे. सावंतांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे की काय, हे तपासण्याची गरज असल्याचे नगरशहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी म्हटले आहे. 

        सोलापूर येथे माध्यमांशी बोलताना ना.सावंत चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले. त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींवरच चढ्या आवाजात प्रश्नांची सरबत्ती केली. काळे म्हणाले की, माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून या देशात ओळखले जाते. लोकहिताच्या विषयांबाबत मंत्र्यांना प्रश्न विचारणे हा माध्यमांचा अधिकार आहे आणि त्यांची संयमाने योग्य ती उत्तरे देणे ही मंत्र्यांची जबाबदारी आहे. मात्र डोक्यात सत्तेची हवा गेलेल्या मंत्र्यांचा तोल ढासळलेला पहायला मिळत आहे. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. 

        महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतदादा पाटील यांचे शिक्षण कमी झालेले होते. मात्र ते अत्यंत सुशिक्षित आणि विकासाची दृष्टी आणि सबंध महाराष्ट्राला न्याय देण्याची क्षमता असणारे नेतृत्व म्हणून पुरोगामी महाराष्ट्राला माहित आहेत. मात्र सावंत यांनी माध्यमांच्या बुम माईकला दांडके असे हिनरीत्या संबोधत माझे शिक्षण काय आहे, मी डॉक्टरेट मिळविलेला माणूस आहे, असे उपरोधिकरित्या प्रसार माध्यमांनाच सुनावले. शिक्षणाचा अभिमान असावा, अहंकार असू नये. सावंतांनी वसंतदादा पाटलांचा आदर्श घेण्याची गरज आहे असा खोचक सल्ला काळे यांनी दिला आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने